“सीएम चषक” कडे लक्ष घालण्याऐवजी, इकडे लक्ष घातले असते…. तर कदाचित ते वाचले असते

0
22

किमान मृत्युदर तरी घटला असता

नांदेड (प्रतिनिधी) ,दि.३१ः :महाराष्ट्रात कुपोषणामुळे होणारे बालकांचा मृत्यु अजून जैसे थे चीअवस्था असून, सरकार बदलून सुद्धा बालमृत्यूंचा गंभीर प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी म्हटले आहेत. केवळ जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यामध्ये महाराष्ट्रात तब्बल ११,९३२ बालमृत्यूची नोंद झाली आहे. परंतु हे प्रमाण आधीच धक्कादायक असताना त्यात कमी वजनाच्या बालकांचे सुद्धा प्रमाण वाढत असल्याची आकडेवारी समोर येते आहे.
परंतु, केवळ निवडणुकांसाठी आणि पक्ष विस्तारासाठी सत्तेत आलेलं हे सरकार या गंभीर विषयाच्या बाबतीत असंवेदनशील आहे असंच म्हणावे लागेल. आपल्यासाठी सीएम चषक हे तितकेच महत्वाचे वाटत असले तरी आमच्या जनतेला आरोग्यही त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असल्याचे कलमूर्गे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे ही गंभीर समस्या माहित असताना सुद्धा सरकारमधील जवाबदार मंत्री भलत्याच कार्यक्रमांना आणि विषयाभोवती वेळ घालवताना दिसत आहेत. त्यामुळे एकप्रकारे अशा बालकांना एकप्रकारे मृत्यूच्या खाईत ढकलल्यासारखे अप्रत्यक्ष प्रकार सुरु आहेत असंच म्हणावं लागेल.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माहितीनुसार, दगावलेली मुले शून्य ते ५ वयोगटातील आहेत. यामध्ये शून्य ते १ वर्ष वयोगटातील ९,३७९ मुलांचा, तर एक ते पाच वर्षे वयोगटातील २,५५३ मुलांचा समावेश असल्याचे आकडेवारी सांगते. दरम्यान, कुपोषित मुलांसाठी पोषण आहाराच्या योजना आखल्या जातात, तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात असतील तर हे बालमृत्यू रोखण्यास राज्य सरकार अपयशी का ठरते, असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ शकतो.
जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यामधील अंदाजित उपलब्ध आकडेवारीचा विचार केला असता, सदरील आकडेवारी ही महाराष्ट्र नामाच्या वृत्तानुसार मांडणी केले असून,सप्टेंबर २०१८ मध्ये कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसते. शून्य ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची पोषण स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समजते. एकूण वजन घेतलेल्या मुलांचे प्रमाण ५८ लाख ७७ हजार २८१ इतके आहे, त्यानुसार साधारण श्रेणीतील ५२ लाख ३५ हजार ९९४ मुले आहेत तर मध्यम कमी वजनाच्या मुलांमध्ये ५ लाख ५२ हजार ९२४ मुलांचा समावेश आहे. तीव्र कमी वजनाच्या गटात एकूण ८८,३६३ मुले येतात. या आकडेवारीनुसार मध्यम तसेच तीव्र कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण ६ लाख ४१ हजार २८७ इतके आहे.
कोर्टाकडून सुद्धा सरकारला वारंवार निर्देश दिले जातात, पण तरी सुद्धा मुलांचे मरण्याचे आणि कुपोषणाचे प्रमाण कमी होत नाही ही खेदजनक गोष्ट आहे. दरम्यान, सरकारकडून जर सक्षम आरोग्यसेवा मिळत असतील तर बालमृत्यू साहजिकच कमी व्हायला हवेत. कमी होण्याऐवजी कशामुळे वाढत आहेत, मंत्र्यांनी स्वतःच्या आरोग्यसोबत गोरगरीब जनतेच्या आरोग्याकडे पण लक्ष दिले तर आपले जनतेवर खूप मोठे उपकार होतील, असे कलमूर्गे यांनी म्हटले आहेत.

जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान झालेल्या बालमृत्यूची माहिती

महिना — नवजात मृत्यू — बालमृत्यू – एकूण मुलांचे मृत्यू

जानेवारी : १११८ -३०४ – १४२२
फेब्रवारी : ८९७ – २६३ – ११६०
मार्च : ९०३ – २६१ – ११६४
एप्रिल : ८५९ -२५३ -१११२
मे : ९१८ – २२६ – ११४४
जून : १००५- २५६ – १२६१
जुलै : १०१६ – ३०४ -१३२०
ऑगस्ट : १३४५ – ३०१ – १६४६
सप्टेंबर : १३१८ – ३८५ -१७०३
एकूण : ९३७९ – २५५३ – ११९३२
सप्टेंबर २०१८ मधील कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण

एकूण वजन घेतलेली मुले – ५८७७२८१
साधारण श्रेणी : ५२३५५९९४
मध्यम कमी वजनाची बालके : ५५२९२४
तीव्र कमी वजनाची बालके : ८८३६३
एकूण कमी वजनाची बालके (मध्यम तीव्र) : ६४१२८७