ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे 81 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन

0
7

नवी दिल्ली ,दि.01(वृत्तसंस्था)- बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते कादर खान यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. कादर खान गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. उपचारासाठी ते कॅनडामध्ये मुलाबरोबर राहत होते. काही दिवसांपूर्वीच कादर खान यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात आज पहाटे नव्या वर्षाची सुरुवात या वाईट बातमीने झाली आहे.कादर खान यांचा मुलगा सरफराज यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेदरम्यान कादर खान यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कॅनडात अंत्य संस्कार करायचे की, भारतात आणून अंत्यसंस्कार करायचे याबाबत कुटुंबीय निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या निधनाने नववर्षाच्या सुरुवातीलाच सिनेसृष्टीवर शोककळा पसरली.

दुपारी ते कोमात गेलेत आणि संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. गत १६ ते १७ आठवड्यांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. आमचे अख्खे कुटुंब कॅनडात आहे. त्यामुळेच त्यांच्या पार्थिवावर कॅनडातचं अंत्यसंस्कार होतील.कादर खान हे प्रोग्रेसिव्ह सुप्रान्यूक्लीयर पाल्सी या आजाराने ग्रस्त होते. यामुळे त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले होते. २२ आॅक्टोबर १९३७ रोजी जन्मलेल्या कादर यांनी १९७३ मध्ये ‘दाग’ या चित्रपटातून अभिनय कारकिर्द सुरु केली होती. यात राजेश खन्ना मुख्य भूमिकेत होते. यापूर्वी रणधीर कपूर व जया बच्चन यांच्या ‘जवानी दिवानी’ या चित्रपटासाठी कादर खान यांनी संवाद लेखन केले होते. मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासोबत त्यांनी अनेक पटकथा लिहिल्या.मनमोहन देसाई यांच्यासोबत मिळून कादर खान यांनी धर्मवीर, गंगा जमुनी सरस्वती, कुली, देशप्रेमी, सुहाग, अमर अकबर अँथोनी आदी चित्रपटांच्या पटकथा  लिहिल्या. तर मेहरा यांच्यासोबत मिळून ज्वालामुखी, शराबी, लावारिस, मुकद्दर का सिकंदर अशा अनेक चित्रपटांच्या पटकथांचे लेखन केले. त्यामुळे अभिनेता, संवाद लेखक शिवाय पटकथा लेखक अशी कादर खान यांची ओळख होती.कादर खान यांनी सुमारे ३०० चित्रपटांत काम केले आणि २५० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संवादलेखन केले.