आंतरजातीय विवाहासाठी आता अडीच लाख रूपये

0
13

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राजकुमार बडोले यांची घोषणा

पुणे, दि. 4 (प्रतिनिधी) ः जातीव्यवस्थेच्या विरोधात समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला दोन लाख पन्नास हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केली.पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ए.पी.जे. अब्दुल कलाम आझाद स्मारक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनी कामगिरी करणाऱ्या सावित्रीच्या लेकींचा सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी ते पुढे म्हणाले की, या देशात समताधिष्ठीत संविधान लागू झाले त्या 1950 मध्ये महिला, आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, भटके अशा अनेक घटकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. त्याआधीतर शुद्र आणि स्त्रीयांना जगण्याचाही हक्क नव्हता. त्याविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा ऐतिहासिक संघर्ष केला. हिंदू कोड बिल हे सर्वश्रूत आहे. परंतु आजही स्रीयांबाबत ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली नाही. आजही महिलांच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागतो. मुलीचा झालेला जन्म, जातपंचायतीची जाचक पध्दत, हुंडा पध्दतीतून होणारा छळ आणि हत्या आंतरजातीय विवाहातून होणाऱ्या क्रूर ऑनर किलींगच्या घटना सुरू आहेत. या कुप्रथांच्या विरोधात संघर्ष तीव्र करणे आवश्यक आहे. या सामाजिक समतेच्या क्रांतीच्या  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्याच खऱ्या अग्रदूत होत्या, या शब्दात बडोले यांनी आपले अभिवादनपर भावना व्यक्त केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातून जातीव्यवस्था तोडण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह हा सांगितला.मात्र त्या प्रमाणात आंतरजातीय होताना दिसत नाही. समाजातील अंधःश्रध्दा,जातीय वाद, सरंजामी रूढी-परंपरा, जातपंचायतीच्या नावाची बंधने समाजातून नष्ट करण्यासाठी केवळ आंतरजातीय विवाह हाच पर्याय आहे. त्यामुळे आम्ही आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अडीच लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला. यातील पहिला सामुदायीक आंतरजातील विवाह सोहळा
फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर घेण्यात येईल. या सोहळ्यात येऊन संबंधित जोडप्याने विवाह करावा, असे आवाहन करून बडोले म्हणाले की,
आंतरजातीय कायद्यात आम्ही बदल करणार आहोत. आंतरजातीय विवाह केल्यानंतरच्या घटनांचा मागोवा घेतला तर ऑनर किलींगसारख्या घटनांपासून ते
त्यांच्या अपत्यांना कायदेशीर संरक्षण, पोलिस मदत अशा बाबींचा समावेश या कायद्यात करणार आहोत. भावी काळात आंतरजातीय विवाहांना विशेष
प्रोत्साहनाच्या योजना, शासकिय लाभ, त्यांच्या अपत्यांना काही सवलती अशा बाबींचा समावेश करण्याचा मानस आहे. यासंबंधीच्या कायद्याचा मसूदाही तयार
असल्याचे ते यावेळी म्हणाले.