मुख्य बातम्या:

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ४० जागांवर एकमत- प्रफुल्ल पटेल

मुंबई,दि.05(वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा सकारात्मक झाली असून  ४० जागांविषयी वाद नाही, त्या प्रत्येकी २० जागा असे वाटप झाले आहे. उर्वरित ८ जागांबाबत चर्चा सुरू असून त्यापैकी काही जागा मित्र पक्षांसाठी सोडायच्या आहेत, अशी माहिती रा्ष्ट्वारदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली. पुणे व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचेहीही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेचे जागावाटप आणि विधानसभेबाबत चाचपणीसाठी मुंबईत राष्टÑवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पत्रकारांशी बोलताना खा. पटेल म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या आघाडीला चांगले यश मिळेल. आज राफेलच्या मुद्द्यावर सरकार अडचणीत आले आहे. देशभर शेतकरी नाराज आहेत. प्रत्येक राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे, त्यानुसार स्थानिक आघाड्या होतील, असेही ते
म्हणाले.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही काँग्रेसने वेगवेगळे लढायला हवे, असे वक्तव्य केले आहे. त्यावर, आम्हाला सल्ला देण्याऐवजी आधी तुमच्या मित्रपक्षाला नीट सांभाळा. शिवसेना तुम्हाला झिडकारत आहे आणि तुमचे नेते युतीसाठी सेनेच्या मागे धावत आहेत, असा टोलाही पटेल यांनी लगावला.नगरमध्ये जे घडले त्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या १८ नगरसेवकांनी भाजपाला मदत केली म्हणून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्या नगरसेवकांवर हकालपट्टीची कारवाई होऊ शकते, पण त्यासाठी पक्षाच्या घटनेनुसार प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Share