गोंदियात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय आज होणार?

0
14

गोंदिया,दि.07 : तालुक्यातील बिरसी-कामठा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही या विमानतळावरून वाणिज्य विमानसेवा सुरू करण्यात आलेली नाही. मात्र, विविध एअरलाइनकडून त्यांच्या इच्छेनुसार विमानसेवेचा मार्ग निवडण्याची प्रक्रिया ७ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर विमानसेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती बिरसी विमानतळ संचालक सचिन खंगार यांनी दिली.

तत्कालीन विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया जवळील बिरसी येथे सुमारे ४०० एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे बिरसी येथील विमानतळावर प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे. यासह नाईट लँडीगचीसुद्धा सोय या विमानतळावर उपलब्ध आहे. गोंदिया जिल्ह्यासह जवळील बालाघाट, भंडारा, गडचिरोली आदी जिल्ह्यात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन घेतले जात असून या भागात राईस मिलची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील तांदूळ मुंबईसह इतर ठिकाणी पाठविला जातो. तसेच गोंदिया येथे कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना खरेदीसाठी मुंबई, कोलकाता, येथे नेहमी जावे लागते. सध्या बिरसी विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू नसल्याने त्यांना नागपूर आणि रायपूरला जावे लागते. मात्र, ही सेवा येथील विमानतळावर उपलब्ध झाल्यास त्यांना त्रास कमी होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात विमानसेवा सुरू झाली तर गोंदियासारखे मागासलेले ठिकाण नागपूर, जबलपूर, रायपूर, मुंबई, कोलकाता बंगळुरू शहरांशी जोडले जाणार आहे. तसेच बिरसी येथे विमानचालक प्रशिक्षण केंद्रही असून गेल्या ८ वर्षात अनेक विमान चालक प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र, या विमानतळाचा वापर केला जात नसल्यामुळे लवकरात लवकर बिरसी येथे विमानसेवा सुरू करण्यात यावी. याबाबतची मागणीही करण्यात आली होती. एप्रिल महिन्यापयंर्त विमानसेवा सुरू करू, असे आश्वासनही देण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारने गोंदियातून विमानसेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. बिरसी विमानतळावरील विमानसेेवेकरिता इच्छुक असणाऱ्या एअरलाईन्स कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी वाहतुकीसाठी आपल्या मार्गाची निवड केली असून तो अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालावर येत्या ७ जानेवारीला निर्णय घेण्यात येणार आहे.