ओबीसी युवक आमदार- खासदारांच्या दारी हल्लाबोल करणार

0
8

नागपूर,दि.08:- ओबीसी युवा सभेच्या वतीने येथील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे रविवार ०६ जानेवारीला ‘प्रश्न तुमची, उत्तरे आमची’ ! या कार्यक्रमाचे आयोजन उत्स्फूर्तपणे झाले. याप्रसंगी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमातून युवकांनी आमदार- खासदारांच्या दारी आपल्या न्याय- हक्कासाठी हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला.
उदघाटन माजी नगरसेवक ऍड. अशोक यावले यांच्या हस्ते संविधानाला मानवंदना करून दीप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ओबीसी युवानेते पराग वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी वकील संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव ऍड. ऍड गिरीश दादीलवार होते. मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा मुख्य संयोजक नितीन चौधरी होते. प्रास्ताविक युवानेते शुभम केदार यांनी केली.
यावेळी अशोक यावले म्हणाले की, ओबीसीची विघटीत अस्मिता असल्यामुळे एकत्रित लढा उभा होत नाही. आरक्षण गरीब हटाव कार्यक्रम नसून वंचितांना समाज प्रवाहात आणण्याचे एक माध्यम आहे. आरक्षणात कुठल्याही किमान पात्रतेला कुठेही तडजोड नाही. ऍड. गिरीश दादीलवार म्हणाले की, मंडल आयोगामुळे ओबीसींना खरे अधिकार प्राप्त झाल्याने ओबीसी मुक्तीचा जाहीरनामा म्हणजेच मंडल आयोग होय. नितीन चौधरी म्हणाले की, ओबीसींमध्ये जागृक्ता आणि माहितीचा अभाव असल्यामुळे ते आपल्या प्रश्नांवर लढताना कमजोर पडतात. राजकारणातही आम्ही कमजोर असल्याने न्याय- अधिकार आपल्या बाजूने वळवू शकत नाही.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये उपस्थित ओबीसी युवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये कलम ३४०, ओबीसी आयोग मराठा आरक्षण व एसईबीसी, केंद्राच्या ओबीसी शिष्यवृत्ती योजना, ओबीसी बॅकलॉग, ओबीसी मंत्रालय निष्क्रियता, परदेशी उच्चशिक्षणाबाबत राज्यशासनाने केलेली फसवणूक, ओबीसी जनगणना, आणि ओबीसी जातिगत जनगणना अहवाल २०११ या महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन व उत्तरे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी संकल्प करण्यात आला की, ओबीसी युवा न्याय- हक्कासाठी ओबीसी आमदार व खासदारांच्या दारी जाऊन संबधीत विषयांवर प्रश्न विचारण्यात येणार आहे. या अभियान चमू मध्ये राम वाडीभष्मे, शुभम वाघमारे, निकेश पिने, हर्ष वानखेडे, पराग वानखेडे, शुभम केदार, पंकज क्षीरसागर, प्रतीक सपाटे, सचिन कापगते, अंकूश राजूरकर आदी ओबीसी युवकांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे संचालन निकेश पिने यांनी केले. तर शुभम वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता हर्ष वानखेडे, राम वाडीभष्मे यांनी विशेष परिश्रम घेतले.