जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘हिरवी वैरण’ महत्वाची – तहसीलदार हिंगे

0
11
भंडारा,दि.8 : पशुसंवर्धन विभाग साकोली व स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या सौजन्याने नुकताच तालुकास्तरीय ‘चारा साक्षरता अभियान’ कार्यशाळा स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. उद्घाटनीय भाषणात साकोलीचे तहसीलदार अरविंद हिंगे म्हणाले की, जनावराच्या सदृढ आरोग्यासा’ी व उत्पादकता वाढविण्यासा’ी हिरवी वैरण महत्वाची असल्याचे म्हटले.
या कार्यशाळेचे उद्घाटन तहसीलदार साकोलीचे अरविंद हिंगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीचे सचिव प्रकाश बाळबुध्दे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तर प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक आयुक्त, पशु संवर्धन  डॉ. प्रभाकर मस्के, उपविभागीय अभियंता लघू पाटबंधारे उपविभाग साकोलीचे चाचेरे, तज्ञ मार्गदर्शक डॉ. पंजक कापगते, डॉ. अंकिता पोयरेकर प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून प्रकाश बाळबुध्दे म्हणाले की, राज्यातील अपुर्‍या पावसामुळे निर्माण झालेली चारा टंचाई निवारण्यासाठी मोठया प्रमाणावर चारा पिकाची लागवड करावी त्यामुळे दुधाळ जनावरांची उत्पादक क्षमता वाढण्यासोबतच सकस आहारामुळे जनावरांचे आरोग्यमान सुधारून रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
या कार्यशाळेला तालुक्यातील विविध गावातील ९० पशुपालक आवर्जुन उपस्थित होते. सर्व पशुपालकांना शासन मोफत बियाणे व खते देणार आहे. काही पशुपालकांना मोफत बियाणे आणि खते प्रसंगी वाटप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुधनविकास अधिकारी तथा विस्तार पंचायत समिती साकोलीचे डॉ. नरेश कापगते यांनी केले. तर आभार प्रदर्शन पशुधन विकास अधिकारी डॉ. अंकिता पोयरेकर यांनी मानले.