मुख्य बातम्या:
प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल# #ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय# #ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे# #बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल# #अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित# #महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये# #वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन# #२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन# #शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे# #नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

मुख्यमंत्र्यांनी साधला व्हि.सी.द्वारे शेतकऱ्यांशी संवाद

वाशिम, दि. १४ : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतीचा पोत बिघडला आहे. विषमुक्त अन्न ही आज काळाची गरज झाली आहे. शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न वाढविण्यासोबतच त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी वाशिम येथे सेंद्रिय मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यात जास्तीत जास्त सेंद्रिय उत्पादक शेतकरी गट तयार करण्यासाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.आज ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

अनसिंग येथील राजाभाऊ इंगळे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना म्हणाले, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत बीज प्रक्रिया संयंत्र मिळाले आहे. या संयंत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे धान्य जागेवरच स्वच्छ करून देण्यात येत असल्याने शेतमालाला दीडपट भाव मिळत आहे आणि मला रोजगार सुध्दा उपलब्ध झाला आहे. हे केवळ शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमुळेच शक्य झाले आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची विनंती त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली असता मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला निश्चितच प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले. श्री. इंगळे पुढे म्हणाले की, सेंद्रिय शेतीमुळे विषमुक्त पाणी, विषमुक्त धान्य आणि विषमुक्त वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील शेतकरी परमेश्वर झनक मुख्यमंत्र्याशी बोलतांना म्हणाले, मी काही वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहे. आमची शेतकरी उत्पादक कंपनी असून जवळपास ३५० शेतकरी या कंपनीशी जोडले आहेत. यातील ५० शेतकऱ्यांनी सन २०१६-१७ या वर्षात ५० एकर क्षेत्रावर सेंद्रिय शेती केली. आता सेंद्रिय शेतीचे क्षेत्र ३५० एकर इतके झाले आहे. उडीद, मुग, चवळी, तूर व भाजीपाला पिके आम्ही घेत आहोत. कृषि विभागाच्या पुढाकाराने व मार्गदर्शनामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत आपल्याला अवजारे बँक मिळाल्याचे सांगून मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी वसंता लांडकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना सांगितले, सन २०१६-१७ या वर्षात २५ लाखांची अवजारे बँक मिळाली. यामध्ये तीन ट्रॅक्टर, दोन थ्रेशर मशीन, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र मिळाले आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांची सोयाबीन मळणी प्रतिक्विंटल ११० रुपये दराप्रमाणे आता करून देण्यात येत आहे. पूर्वी यंत्र असलेले शेतकरी आपल्या मनमानीने २०० रुपये प्रतिक्विंटल मळणीचे दर आकारायचे. मात्र आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अल्पदरात धान्याची मळणी करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. गेल्यावर्षी आमच्या कंपनीने १८०० क्विंटल सोयाबीनची मळणी केली. त्यामुळे १ लक्ष ६२ हजार रुपयांचा सामान्य शेतकऱ्यांना फायदा झाला व कंपनीला ८० हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. यावर्षी देखील २ हजार क्विंटल सोयाबीनची मळणी करून १ लक्ष ८० रुपये शेतकऱ्यांचा तर ७५ हजार रुपये शेतकरी उत्पादक कंपनीला फायदा झाला आहे. आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीने गावातील मनमानी करणाऱ्या शेतकऱ्यांची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत काढून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. तसेच बिजोत्पादन, बीज प्रक्रिया संयंत्र व गोदाम यांचाही आमच्या कंपनीने लाभ घेतला असून अनुदान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावर बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कृषि यांत्रिकीकरण उपअभियानांमुळे शेतकऱ्यांचे श्रम कमी होऊन त्यांच्या खर्चात व वेळेत बचत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

वाशिम तालुक्यातील धुमका येथील प्रगतशील शेतकरी अनिल धुळे यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामुहिक शेततळे मिळाल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले. मागील वर्षी गावाशेजारील धरणात पाणी नसल्यामुळे डाळिंबाची बाग जगविणे कठीण झाले होते. मात्र सामुहिक शेततळे मिळाल्यामुळे या शेततळ्यातील पाण्याचा वापर डाळिंबाची झाडे वाचविण्यास झाल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. माझ्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकरी पपईची लागवड करतात, मात्र पपईला फळपिक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे जर पपईचे नुकसान झाले तर शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे पपई पिकाचा समावेश फळपिक विमा योजनेत करावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी केली असता मुख्यमंत्र्यांनी लवकरच कृषि विभागाशी बोलून पपई पिकाचा समावेश फळपिक विमा योजनेत करण्याची ग्वाही त्यांना दिली. नाफेडला २९ मे २०१८ ला हरभरा विकला, परंतु आजपर्यंत विकलेल्या हरभऱ्याचे पैसे मिळाले नसल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून देताच मुख्यमंत्र्यांनी ही बाब गंभीर असल्याचे सांगून त्वरित पैसे देण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

मानोरा तालुक्यातील म्हसनी येथील रेशीम शेती करणारे शेतकरी रवींद्र पंडित यांनी जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. प्रत्येक रेशीम उत्पादक शेतकऱ्याच्या घरी रेशीम धागा काढण्याचा कारखाना असला पाहिजे, तसेच बँकांनी शेड बांधण्यासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, निश्चितच रेशीम शेतीला चालना देण्यात येईल. कारण या शेतीतून अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. वर्षातून तीनदा रेशीम पीक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतो. म्हणून जिल्ह्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या शेतीकडे वळविण्यासाठी निश्चितच पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

‘लोकसंवाद’ कार्यक्रमामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मानोरा तालुक्यातील देऊरवाडी येथील तुळशीराम ढोके, वाशिम येथील रवी भोयर, कोंडाळा महाली येथील कैलास डाखोरे, व्याड येथील जगन बोरकर, वनोजा येथील गणेश कुरवाडे यांनीही सहभाग घेतला.

Share