सरकारकडून ओबीसी मराठा समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम- छगन भुजबळ

0
17

सिन्नर,दि.16ः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा अधिकार सर्व नागरिकांना दिले. मोदी सरकारने मात्र केवळ जनतेची फसवणूक करण्यासाठी सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिले.तसेच ओबीसी आरक्षण कमी करण्यासाठी कोर्टात केस दाखल होत असताना सरकारकडून आपली भूमिका स्पष्ट केली जात नसून सरकारकडून मराठा, ओबीसी आणि दलित सवर्णामध्ये भांडणे लावण्याचे काम केले जात असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आयोजित निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेनिमित्त सिन्नर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार हेमंत टकले, जितेंद्र आव्हाड, जयदेव गायकवाड,माजी मंत्री तुकाराम दिघोळे, माजी मंत्री फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, ओबीसी सेलचे ईश्वर बाळबुधे, ज्येष्ठ नेते बापू भुजबळ, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, विश्वास ठाकूर, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सिन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ,शिवाजी सहाणे, निवृत्ती अरिंगळे, युवा नेते आशुतोष काळे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, आदी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, गेले साडेचार वर्ष गप्प असलेल्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींना साडेसातशे कोटी रुपयांच्या योजना आणल्या जात आहे.मतांचा गठ्ठा मिळविण्यासाठी सरकारला कळवळा सुटला आहे. अगोदर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती द्या आणि मग नवीन योजना आना असे त्यांनी ठणकावून सांगितले.नाशिकचे उद्योग पाठविण्याचा घाट घातला जात आहे. नार पारचे गुजरातला वाहून जाणारे पाणी पाठविण्याचा घाट घातला जात आहे असे अनेक प्रकल्प पळविण्याचे प्रयत्न भाजप सरकारकडून केले जात आहे.७२ हजार नोकर भरती केली जाणार होती मात्र अद्याप भरती झाली नाही.

शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे सरकारला लक्ष देण्यासाठी वेळ नाही. कांद्याला खर्च ८०० रुपये आणि अनुदान २०० रुपये ही शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. महागाई मोदीच्या आणि लालकृष्ण आडवाणी च्या वयापुढे गेली आहे ते एमडीएच मसाले वाल्यां आजोबांच्या वयाच्या पुढे जाऊ नये अशी टीका त्यांनी केली. देशात मोदी सरकारच्या विरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज बंद केला जातो. सीबीआय अधिकाऱ्याने राफेल प्रकरणाची चौकशी सुरू केल्यावर त्यांना पदावरून हटविण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची टीका त्यांनी केली.मोदी सरकारचे गर्वाचे घर खाली करण्यासाठी परिवर्तन घडवावेच लागेल असे आवाहन त्यांनी केले.यावेळी सिन्नर येथील शहीद जवान केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना मेट भुजबळ नॉलेज सिटीतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री करून त्यांच्या मुलीच्या नावे ५१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तसेच मुलीचे संपूर्ण शिक्षण मेट कॉलेजच्या माध्यमातून करण्यात येईल अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी दिली.