‘डीपीडीसी’तून ३४ लाख रुपये मंजूर ईटीएस मशीनमुळे जमीन मोजणी होणार गतीने !

0
38

वाशिम, दि. २१ : जिल्ह्यातील प्रकल्प, शेतीची मोजणी तसेच भूसंपादन प्रकरणांच्या मोजणीची कामे तातडीने व्हावी, यासाठी इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस) मशीन जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला जिल्हा नियोजन व विकास समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेच्या सन २०१८-१९ या वर्षातील निधीतून मिळणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी विशेष लक्ष देवून जमीन मोजणीची कामे तातडीने व्हावीत, यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला ३४ लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आता प्रलंबित जमिन मोजणी प्रकरणे व नगर भूमापन कामांचा निपटारा गतीने व सुलभ होण्यास मदत होणार आहे.

ईटीएस मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे या मशीनने मोजणी अचूक होते. या मशीनने मोजणी केल्यामुळे मोजणीबाबत भविष्यात तक्रारी येणार नाहीत. मोजणी कमी वेळात होत असल्यामुळे वेळेची बचत होते. भूसंपादनाच्या मोजणीची कामे तातडीने करण्यास देखील ही मशीन उपयुक्त ठरणार आहे. ईटीएस मशीनने मोजणी केल्यामुळे मोजणी प्रकरणांमध्ये जलद गतीने कार्यवाही होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील हद्द कायम मोजणी प्रकरणे, बिनशेती, पोटहिस्सा इत्यादी मोजणी प्रकरणेही याच मशीनवर करण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकांमध्ये पूर्वी मोजणीबाबत असलेल्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल.