अर्जुनी मोर व साकोली पं.स.च्या नव्या इमारत बांधकामाला मंजुरी

0
12

गोंदिया,दि.24ः- मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव व भंडारा जिल्ह्यातील साकोली पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला अखेरीस राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 23 जानेवारीला प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्यामुळे या दोन्ही ईमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून निवडणुक आचारसहिंतेपुर्वी या इमारत बांधकामाच्या भूमिपूजनासाठी प्रशासन कामाला लागण्याची शक्यता आहे.अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी 3 कोटी 70 लाख रुपये तर साकोली येथील इमारतीच्या बांधकामासाठी ४ कोटी ९६ लाख ३0 हजार रुपये किंमतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने आता पंचायत समितीच्या प्रशस्त इमारतीचा मार्ग सुकर झाला आहे.
साकोली पंचायत समितीच्या कार्यालयाची इमारत जुनी व बर्‍याच ठिकाणी नादूरुस्त असल्यामुळे नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी सन २0१0 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सदर इमारतीचे बांधकाम साकोलीतील गट क्र . २६६ या जागेवर प्रस्तावित होते. परंतु, सदर जागेवर जिल्हा परिषदेद्वारे व्यापारी संकुलाचे बांधकाम प्रस्तावित झाल्याने पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करता आले नाही. त्याला आता पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्यामुळे तसेच बांधकामाला सुरुवात झाली नसल्यामुळे मूळ प्रशासकीय मान्यता आदेश रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने सादर केला होता. त्यानुसार सन २0१0 ची प्रशासकीय मान्यता रद्द करून आता नव्याने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नव्या मान्यतेनुसार पंचायत समितीच्या इमारतीचे बांधकाम गट क्र मांक २४0 मधील १ हेक्टर जागेमध्ये होणार आहे. त्यासाठी ४ कोटी ९६ लाख ३0 हजाराच्या अंदाजपत्रकीय किमतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समितीची इमारत पुर्णतःजिर्ण झाली असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्राच्या आधारे या इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.1961 मध्ये तयार झालेली ही इमारत आजच्या घडीला दुरुस्त करण्यालायक नसून कुठलीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाने मंजुरी दिली आहे.नवीन इमारत बांधकामासाठी 7 फेबुवारी 2012 रोजी मंजुर करण्यात आलेला ठरावानुसार 1026 चौमीटर क्षेत्रात बांधकाम करण्यात येणार आहे.पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी यासाठी सातत्याने प्रयत्न चालविले होते.विशेष म्हणजे नव्या इमारतीमध्ये पदाधिकारी यांच्याकरीता जे कक्ष तयार करण्यात येतील त्याशेजारी महिला पदाधिकारी यांच्याकरिता कक्षसोबतच विश्रातींगृह शौचालयासह तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत.ग्रीनबिल्डींग व जलःपुर्नभरण योजनेसह सौर उर्जेचा अधिकाधिक वापर कसा होईल या पध्दतीने सदर इमारतीचे बांधकाम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.