रेल्वेबोगीत पर्स चोरट्याला रंगेहाथ पकडले

0
13

गोंदिया,दि.१५: गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर रेल्वेच्या जनरल बोगीत प्रवाशाच्या खिशात हात घालून पर्स चोरी करणाऱ्या १९ वर्षीय आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ही कारवाई १२ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आरपीएफ टास्क टीम कर्मचाऱ्यांनी केली आहे.रेल्वेस्थानक परिसरात चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आरपीएफ, टास्क टीम कर्मचारी तैनात करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गाडी क्र.५८८०४ बल्लारशाह पॅसेंजरच्या जनरल बोगीत चढणाऱ्या तसेच खाली उतरणाऱ्या प्रवाशांवर पाळत ठेवून असलेल्या आरोपी आकाश राधेश्याम भालाधरे (१९) रा. सिंगलटोली गोंदिया याला संशयास्पद हालचालीवरून ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान, त्याच्याकडून काळ्या रंगाचा पर्स जप्त करण्यात आला. पर्समध्ये भास्कर यवलकर यांच्या नावाने बँक ऑफ इंडियाचे एटीएम, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट फोटो, नगदी १ हजार २६० रुपये व आवश्यक दस्तऐवज मिळून आले. दरम्यान, बोगीत बसून असलेले प्रवासी भास्कर विश्वनाथ यवलकर (४७) रा. दत्तात्रेयनगर नागपूर यांच्याकडे चौकशी केली असता पर्स चोरी झाल्याचे सांगितले. आरोपीची कसून चौकशी केली असता प्रवाशांची पर्स चोरी केल्याची कबुली दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून रेल्वे ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपीएफ मंडळ सुरक्षा आयुक्त नागपूर आशुतोष पांडेय व साहाय्यक मंडळ सुरक्षा आयुक्त ए.के. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदियाचे प्रभारी निरीक्षक एस. दत्ता यांच्या निर्देशान्वये ही कारवाई करण्यात आली.