संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने

0
450

समाजसुधारक संत सेवालाल महाराज
आपल्या महाराष्ट्राला संतांची पुरातन अशी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या मातीला जसा पराक्रमाचा वारसा आहे तसा संतांच्या विचारांचा गंध आहे.महाराष्ट्र भूमीत अनेक जाती धर्मातील साधुसंत प्रबोधनकारांनी जन्म घेतला याच थोर साधू संतांच्या विचारातूनच महाराष्ट्राची जडणघडण झालेली आहे.समाजातील वाईट चालीरीती,अज्ञान, जाती व्यवस्था नष्ट करण्याचे महत्कार्य संतांनी केळवे आहे.संताची शिकवण आजही आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे. संतांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याची आजही गरज आहे.
15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे त्या अनुषंगाने समाजसुधारक संत सेवालाल महाराजांच्या विचारांना उजाळा देणारा हा लेख प्रपंच
थोर संत समाजसुधारक एखाद्या विशिष्ट जातीत एखाद्या विशिष्ट धर्मात जन्माला येत असले तरी त्यांचे कार्य त्या जातीसाठी मर्यादित राहत नाही, तर त्यांचे कार्य राष्ट्राच्या प्रत्येक जीवासाठी उपयोगी असते. समाजाला योग्य दिशा देण्याचे व योग्य मार्गावर घेऊन जाण्याचे कार्य संत करीत असतात. अशाच एका थोर संतांची माहिती या लेखातून आपल्यासमोर सादर.
भारतातील अनेक थोर संतांपैकी एक संत सेवालाल महाराज इसवी सनाच्या आठराव्या शतकात होऊन गेले. हजारो वर्षापासून अंधारात खितपत पडलेल्या,रानावनात भटकंती करून गुजराण करणाऱ्या बंजारा समाजात संत सेवालाल महाराजांचा जन्म झाला.भारतीय संस्कृतीत विविध भाषा,धर्म, पंथ,जाती,वंश,बोली भाषा वेशभूषा इत्यादींचा सुंदर मिलाफ दिसून येतो. आपल्या अनोख्या सांस्कृतिक वैशिष्ट्यानी सर्वांना आकर्षित करणारा समाज म्हणजे भारतातील बंजारा समाज होय.भारतातील वेगवेगळ्या प्रांतात विखुरलेल्या बंजारा समाजात संत लखीशा बंजारा नंतर प्रभावी आणि समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या संतांपैकी एक संत म्हणजे संत सेवालाल महाराज.सेवालाल महाराजांची शिकवण म्हणजे समाजासाठी संजीवनीच ठरले.पूर्वीच्या काळी बंजारा समाजाला अक्षर गंधहीन नसल्याने संत सेवालाल महाराजांचे कोणतेही साहित्य लिखीत स्वरुपात उपलब्ध नाही.परंतु आता त्यांचे दोहे,वचने, कवणे इत्यादींचे संकलन पुस्तक रुपाने होत आहे.फिरस्ते व्यापाराच्या निमित्ताने भारतभर भ्रमंती करीत असताना संत सेवालाल महाराजांनी भारतातील अनेक संतांच्या कार्याविषयी माहिती मिळाली,त्यातून सत्याचा शोध घेऊन आपल्या समाजाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविण्याचे काम संत सेवालाल महाराजांनी केले. समाजात संत सेवालाल महाराज म्हणून ओळखले जाणारे संत सेवालाल त्यांचा जन्म बंजारा समाजात माघ कृष्ण पक्ष शके १६६१ दि. १५ फेब्रुवारी, १७३९ रोजी तेलंगणा राज्यातील गुलालदोडी ता. गुत्ती जि.अनंतपूर येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक तर आईचे नाव धर्मणी होते.भीमा नाईक तांड्याचे नायक होते.संत सेवालाल महाराजांचा एक संत म्हणून विचार करताना त्यांचे विचार भारतीय संत परंपरेतील भगवान महावीर, संत कबीर,संत बसवेश्वर, संत तुकाराम,संत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या तोडीची आहेत.परंतु त्यांचे विचार अलिखित असल्याने पुस्तक स्वरूपात उशिरा आल्याने जगाला त्याची फारशी माहिती नसावी.
संत सेवालाल महाराजांचे मानवतावादी विचार:-
श्री संत सेवालाल महाराजांचे विचार हे मानवतावादी शिकवण देणारे होते.समाजातील भोळ्या समजुती,अंधश्रद्धा , व्यसनाधीनता,अनितिचे व्यवहार,भूतदया, निसर्गप्रेम,स्वकर्तुत्वावर विश्वास,सत्य-अहिंसा इत्यादींविषयी महान विचार,वचने,दोहे व भजने या रूपात प्रकट झालेले आहेत.
१. नेहमी सत्याचे आचरण करा:- सत्य हाच खरा धर्म आहे, नेहमी सत्याचे आचरण करावे. सत्य जाणणे यातच खरे जीवनाचे सार आहे.हे सांगताना संत सेवालाल महाराज म्हणतात-
*सत्यधर्म लिनता ती रेंणू ।सदा सासी बोलंणू । हर वातेनं सोच समजन केवणू । भवसागर पार कर लेंणू ।
भावार्थ- सत्य हाच खरा धर्म आहे. जीवनात नेहमी सत्याचे आचरण करावे नम्रतेने इतरांशी वागावे,प्रत्येक गोष्ट आधी समजून उमजून घेऊन मगच बोलावे तुमच्या अशा वागण्यामुळे तुम्ही जीवनरुपी भवसागर तरून जाल.
२.अहिंसा:-अहिंसा म्हणजे केवळ कोणाची हत्या न करणे एवढाच त्याचा अर्थ नसून काया,वाचा आणि मनाने कोणालाही न दुखावणे होय.गाय कितीही भाकड असली तरी तिला कधीच कसायाला विकू नका,देवी ही सर्वांची आई आहे ती कधीच आपल्या मुलांवर कोपत नाही.म्हणून दुःख,पिडा,त्रास देत नाही. तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबड्या-बकर्यांचा बळी देण्यापेक्षा बेल फुल वाहून शिऱ्याचा नैवद्य देऊन प्रसन्न करा. असा साधा-सोपा ईश्वरभक्तीचा मार्ग संत सेवालाल महाराज सांगतात.असे सांगताना म्हणतात-
* वाडी वस्तीनं सायी वेस । किडी मुंगीनं सायी वेस। जीव जणगाणींन सायी वेस । बाल बच्चानं सायी वेस । सेन सायी वेस।।
हे देवी माते या सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांचे रक्षण कर, वाडी वस्त्या मुंग्यांचे रक्षण कर,मुलाबाळांचे गुराढोरांचे रक्षण कर,सर्वांचे कल्याणकर. थोडक्यात त्यांची वरील रचना बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणावे लागेल असे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या शिकवणी संत सेवालाल महाराज देत.
३.सद्गुणांची जोपासना:-
सद्गुन हेच मनुष्याचे खरे धन आहे.त्याशिवाय जीवनाला काहीच अर्थ नाही.व्यसनाधीनता, हिंसाचार आणि अनितीचे व्यवहार,असत्यापासून माणसाला दूर ठेवण्यासाठी संत सेवालाल महाराज सांगतात
*संणो सांमंणो मार गोर भाई।
लाज रखाडो धर्मेरी ।
मत लो जीव, काडो मत लोही ।
दारू मत पीओ कोई।
धर्मेरी बानी रखाडो भाई ।
कोई मत करजो लुच्ची-लबाडी ।
मत करो रंडीबाजी।
मोरियो केसुला नाहीं।*
भावार्थ-काय तर धर्माची लाज राखा,अहिंसा कोणी करू नका,पशुबळी देऊ नका,दारू कोणी पिऊ नका,चांगल्या संगतीत राहा.लुच्ची-लबाडी,रंडीबाजी करू नका कोणाचीही फसवणूक करू नका ही शिकवण जरूर आचरणात आणली तर पळस ज्याप्रमाणे उन्हात राहूनही बहरते,त्याप्रमाणे तुमचा सुद्धा उत्कर्ष होईल.
४.कोणासही दंडीत न करणे:-
समाजात कष्ट करणारे राबणारे हात अनेक आहेत, ते निरक्षर असून लाचारीचे जिणे जगत आहेत,त्यांचे शोषण करणे थांबवा याविषयी सांगताना संत सेवालाल महाराज म्हणतात-
* गोर गरिबेनं दांडन खाये।
ओर सात पिढी नरकेम जाये।
ओरे वंशेपर दिवो कोणी रिये ।*
मनुष्याने नेहमी सर्वांशी न्यायाने वागले पाहिजे.त्यासमोर गरीब-श्रीमंत,श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव करू नये. जो कोणी गोरगरिबांना न्याय दंड करील त्याच्या सात पिढ्या नरकात जातील त्यांच्यावंशवेलीवर दिवा राहणार नाही.
५.स्व-कर्तृत्वावर विश्वास :- सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचे सूत्रच जणू सेवालाल महाराज पुढील दोह्यातून सांगतात.
*तम सौता तमारे जीवनेमं दिवो लगा सको छो ।
कोई केनी भजो-पुजो मत ।
कोई केती कमी छेनी ।
सौतार वळख सौता करलीजो ।
भजे-पुजेमं वेळ घालो मत ।
करणी करेर शिको, नरेर नारायण बंन जायो।
जाणजो…छाणजो…पचच माणजो…।*
प्रत्येक व्यक्तीत उपजतच उर्जा, शक्ती,सामर्थ्य,गुणवत्ता, बुद्धिमत्ताव योग्यता असतेच.त्यासाठी सर्वप्रथम माणसाचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे.कोणीतरी येईल आणि माझे भले करील माझ्याने होणारच नाही असा न्यूनगंड कोणीही मनात बाळगू नये.तुम्ही स्वतःच्या कर्तुत्वाने स्वतःची ओळख निर्माण करू शकता.स्वतःचे जीवन प्रकाशमान करू शकता. कोणीही कोणापेक्षा लहान-मोठा, श्रेष्ठ-कनिष्ठ नाही देव-धर्म,व्रत,नवस-सायास यात वेळ घालवण्यापेक्षा कर्तुत्व करण्यास शिका. कोणताही विचार, कृती , कार्य करण्यापूर्वी दहावेळा विचार करा डोळस व्हा.हे मी सांगतो म्हणून त्याला अंतिम समजू नका स्वतः अनुभव घ्या सत्य असते याची चिकित्सा करा मेहनत व मनगटावर विश्वास ठेवा तुम्ही असे वागलात तर नराचे नारायण व्हाल.
६.स्वावलंबी बना:-
माणसाने आपल्या जीवनात स्वावलंबी बनले पाहिजे.” जो दुसऱ्यावर विसंबला,त्याचा कार्यभाग बुडाला’ या उक्तीप्रमाणे व्यक्तीने दुसऱ्यावर विसंबून न राहता स्वावलंबी बनावे याविषयी संत सेवालाल महाराज म्हणतात
*केरी भरोसेप मत बेसो ,पण दुसरेर भरोसेर बंनो ।
कोई केरी वाट चालेनी, सौतार वाट सौताच चालो ।*
तुम्ही दुसऱ्याच्या भरोशावर विसंबून राहू नका,परंतु दुसऱ्याच्या भरवशाच्या बना. कोणी कोणाची वाट चालत नाही म्हणजे सर्वकाही स्वतःलाच करावे लागते इतरांची वाट चालण्यापेक्षा स्वतःची नवीन वाट तयार करा असा दिव्य संदेश संत सेवालाल महाराज यांनी दिलेला आहे.
७.कपटनीतीचा त्याग करा:-
छल,कपट,बेईमानी करणार यावर फटकारे ओढताना संत सेवालाल महाराज म्हणतात
*जे कपट वाचा लेन आये ।
पाप ओरे सोबत जाये ।
यम घरेरो फासो ओरे गळेंम पडिये ।
नव मणेरी काया ओरी नरकेम मळजाये ।
लाख चौऱ्यांशी योनी भोगाये ।*
कपट नितिचा व्यवहार करून जे लोकांना फसवतील ते पापाचे भागीदार बनून नरकात जातील,चौऱ्याऐंशीलाख योनीत पापाचे भागीदार बनून भटकत राहतील.म्हणून कोणीही कपटनीतिचा व्यवहार करू नये असे ते सांगतात.
८.चोरी करू नका:-
समाजात मेहनती, नीतिवान व चारित्र्यसंपन्न लोकांची गरज असते चोरी करून पोट भरणाऱ्या विषय संत सेवालाल महाराज सांगतात
*करिये चोरी,खाये कोरी ।
घरे मुढांग एकच मोरी ।
हाते मांही आये हातकडी ।
पग लागीये बेडी ।
हिंडिय रे डोरी डोरी।*
चोर लुटारू माणसे समाजात असतील तर अशांतता पसरते,अराजकता माजते,लोकांना दुःख भोगावे लागते.पण चोरी करणारे पकडले गेले तर त्यांच्या हातात हातकड्या , पायात बेड्या पडतात पोलीस त्याला पकडून गल्लीबोळातून फिरवत नेतात .त्यांच्या मुलाबाळांचे हाल होतात.तेव्हा चोरी करण्यापेक्षा कष्टाची चटणी-भाकरी आवडीने खावी.चोरी केल्याने कोणीही सुखी होत नाही.
९.स्त्रियांचा आदर करा,त्यांना छळू नका:-
पूर्वीच्या काळी समाजात स्त्रियांचा फार छळ होत असे. मूलबाळ होत नसेल त्या स्त्रीला समाजात खूप छळ होत असे.म्हणून तीला हीन दर्जाची वागणूक दिली जात असेल तीचे तोंड पाहणेही अशुभ मानले जाई.श्री संत सेवालाल सांगताना म्हणतात
*वळाई हुई छोरी रो मामलो मत तोडजो ।
म्हणजे विवाहित मुलीची फारकत करू नका तिला सन्मानाची वागणूक द्या.
१०.निसर्गावर प्रेम करा:-
सेवालाल महाराज जिथे जिथे जात थांबत असे,तेथे वड,पिंपळ चिंच व कडुनिंबाचे झाड लावत त्याचे कारण सांगताना म्हणत वडाच्या झाडाची सावली दाट असते. पिंपळाच्या झाडाजवळ पाणी असते .कडुलिंबाचे झाडांमुळे हवेचे शुद्धीकरण होते.औषधी उपयोग होतो इतकेच नव्हे तर मृत्युनंतर आपली समाधी चिंचेच्या झाडाखाली बांधावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती
११. संत सेवालाल महाराज अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला करत असत. अंधश्रद्धेतून लोकांना बाहेर काढण्यासाठी आयुष्यभर सेवालाल महाराज कार्य करत राहिले.विचार देत राहिले. समाजाला योग्य दिशा देऊन योग्य मार्गावर आणण्याचे कार्य महाराजांनी केले.संत सेवालाल महाराजांनी समाजाला सन्मार्गाची जाणीव करून दिली. संत सेवालाल महाराज निरक्षर असूनही त्यांनी समाजाला बुद्धिप्रामाण्यवादाचे आणि विज्ञानाचे धडे दिले त्यांची वचने, दोहे साध्या सोप्या व सरळ अशा बंजारा बोलीभाषेत आहेत.संत सेवालाल महाराजांचे क्रांतिकारी अमृततुल्य विचार केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला स्वावलंबी होण्याची ऊर्जा देणारे आहेत.समानतेची,स्वावलंबी होण्याची, कष्ट करण्याची, लबाडी न करण्याची आणि कुटपणे व्यवहार न करण्याचे चोरी व नशापाणी न करणे कर्मकांडात वेळ पैसा व शक्ती वाया न घालवता, देवी देवतांना बळी न देता प्रत्येक विचार कृती घटनेमागील सत्यता तपासून डोळस बनण्याचे वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे कार्य संत सेवालाल महाराजांनी केले. स्त्रियांना सन्मानाने वागविले पाहिजे म्हणून अनेक प्रयत्न केले निसर्गावर भरभरून प्रेम करण्याचे धडे संत सेवालाल महाराजांनी दिले.एवढेच नव्हे तर त्यांच्या जलविषयक दूरदृष्टीकोन दर्शवणारा एक उत्तम वचन म्हणजे…त्यांनी पाण्याविषयी केलेली भविष्यवाणी आज तंतोतंत लागू होते.ती अशी एक दिवस असा येईल रुपयाचे दहा दाणे चणे विकले जातील एक रुपयाला एक कटोरा पाणी मिळेल, बारा कोसावर एक दिवा दिसेल,बैलाच्या शिंग सोन्याचे होतील, माणसाला माणूस ओळखणार नाही…काळाच्या प्रवाहात सर्वांचा विचार करणारे सज्जन वागेल, पर्यावरणाचा विचार करेल तोच पुढे टिकून राहील,नाही तर तडफडल्या शिवाय पर्याय नसेल असे भविष्यवेधी वैज्ञानिक विचार संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिले.त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

लेखक – श्री.सुभाष रामचंद्र राठोड 9011858485 / 9421922110
[email protected] ,सदस्य,
अभ्यासमंडळ इतिहास व नागरिकशास्त्र समिती, महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम संशोधन व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ बालभारती,पुणे
तथा विषय सहायक ,सामाजिकशास्त्र विभाग ,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण),पुणे
तथा  राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे