मुख्य बातम्या:

वैष्णवी गभणे हिला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

भंडारा,दि.16 : राज्याच्या शाालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १४ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंमध्ये जिल्ह्यातील वैष्णवी संजय गभणे (सायकलींग) हिचा उत्कृष्ट खेळाडूंमध्ये तर राजेंद्र शंकरराव भांडारकर (संघटक) यांचा समावेश असल्याने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारात भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.यामुळे जिल्ह्यातील इतर खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे..

राज्यात १९८८-८९ पासून राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंना ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक, कार्यकर्ते व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपले सर्वस्व अर्पण करून महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनात अतुलनीय स्थान संपादित केले आहे व ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा राज्याच्या क्रीडा जीवनावर संस्मरणीय प्रभाव पडला आहे, अशा क्रीडा महर्षीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला जातो.

तसेच महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रामध्ये मार्गदर्शनपर अतुलनीय कामगिरी बजावून खेळाडूंना घडवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यास उद्युक्त केले आहे. अशा क्रीडा मार्गदर्शकाचा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मान केला जातो. राज्याच्या क्रीडा विभागाने सन २०१७-१८ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा केली आहे. त्यात भंडारा जिल्ह्यातील वैष्णवी संजय गभणे हिचा सायकलींग या क्रीडा प्रकारातील राज्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषणा झाली आहे. वैष्णवी गभणे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक विजेती सायकलपटू आहे. तर राजेंद्र भांडारकर यांची शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार संघटक म्हणून निवड झालेली आहे.

Share