चंद्रपूर सैनिकी शाळेचे 1 जूनला लोकार्पण;प्रधानमंत्री, मुख्यमंत्री उद्घाटनासाठी येणार

0
15

लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी केली पाहणी
भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळेच्या वास्तूचे काम पूर्णत्वाकडे

चंद्रपूर, दि. 16 : भारतात आजमितीला असणाऱ्या सर्व सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम अशी वास्तू चंद्रपूरमध्ये उभी राहात आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारूपास येईल, अशा शुभेच्छा चंद्रपूरच्या सैनिकी शाळेला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिल्या आहेत. या सैनिकी शाळेचे लोकार्पण 1 जून रोजी करण्यात येईल, अशी घोषणा आज राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत केली.
वित्त मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पैकी एक असणारी चंद्रपूर व बल्लारपूर रस्त्यावरील भिवकुंड जवळील हिरव्या गार विस्तिर्ण अशा 123 एकरामधील सैनिकी शाळेची वास्तू पूर्णत्वास येत आहे. 4 हजार कामगार अहोरात्र या ठिकाणी काम करीत असून विक्रमीवेळेत सैनिकीशाळा पूर्ण केली जाणार आहे. सध्या या ठिकाणच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. तर दुसरा व तिसरा टप्पा पूर्णत्वाकडे येत आहे. भारतात अस्तित्वात असणाऱ्या सर्व सैनिकी शाळांपैकी सर्वात अद्यावत अशी, ही इमारत व्हावी यासाठी ते प्रयत्नरत होते. आज या शाळेच्या संदर्भातील प्रवेश व बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यातील आवश्यक सूचना देण्यासाठी लेफ्टन जनरल राजेंद्र निंभोरकर तसेच भारतीय सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि देशातील सैनिकी शाळेचे निरीक्षक अधिकारी रामबाबू आले होते. त्यांच्या उपस्थितीत या शाळेच्या संबंधित प्रमुख अधिकारी व विकासक यांना संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 1 जून रोजी या सैनिकी शाळेचे लोकार्पण होईल, अशी घोषणा केली.
या शाळेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना देखील निमंत्रण देण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. 1 जून रोजी मान्यवरांच्याहस्ते या शाळेचे लोकार्पण आता निश्चित झाले आहे.
या सैनिकी शाळेमध्ये 6 वी व 9 वी इयत्तेनंतर चाचणी परीक्षा दिल्यानंतर प्रवेश मिळणार आहे. या सत्रातील प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये लवकरच जाहिरात दिली जाईल.
या सैनिकी शाळेमध्ये भारतातील अद्यावत असे सैनिकी संग्रहालय देखील उभे राहणार आहे. विशाखापट्टणम, अमृतसर, महु या ठिकाणी असलेल्या सैनिकी संग्रहालया पेक्षा अधिक उत्तम हे संग्रहालय तयार होणार आहे. ताडोबामध्ये पर्यटनाला येणाऱ्या नागरिकांसाठी या शाळेला भेट देणे एक पर्वणी ठरणार असून विशेष कार्यक्रमाच्या आयोजनाची संकल्पना ठेवण्यात आली आहे. पर्यटकांना सैनिकी शाळेच्या दर्शनी भागांमध्ये भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी तयार होणाऱ्या निरीक्षण कक्षातून या संपूर्ण शाळेचे कॅम्पस बघता येणार आहे. पर्यटकांना दर्शनी भागांमध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद वीरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी पुतळे देखील उभे राहत आहेत. या ठिकाणच्या सभागृहामध्ये कारगिल युद्ध, भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र व नौदलाच्या थरारक प्रात्यक्षिकाचे थ्री डायमेन्शन माहितीपट दाखविण्यात येणार आहे. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर या सर्व लढाऊ वस्तू याठिकाणी दर्शनी ठेवण्यात येणार आहे.
या सैनिकी शाळेच्या कॅम्पसची दर्शनी भिंत ही चंद्रपूरच्या किल्ल्याप्रमाणे तयार करण्यात आली आहे. ठिकाणी तयार होणारे मैदान हे ऑलिम्पिक दर्जाचे आहे. एक हजार क्षमतेचे प्रेक्षागृह, आधुनिक स्विमिंग टॅंक पासून तर सर्व सुविधा या भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे असणार आहेत. सैनिकी प्रशिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या घोडसवारीच्या संदर्भातही ट्रॅक तयार करण्यात आले असून सैन्यदलाच्या शिफारशीनुसार या ठिकाणी घोडे देखील पुरविले जाणार आहे. या ठिकाणी मुलांसाठी अद्यावत वसतीगृह व खानपानाच्या सुविधा असतील याशिवाय या शाळेच्या व्यवस्थापनामधील सर्व पदांसाठी निवासी संकुले देखील उभी झाली आहेत. या सैनिकी शाळेच्या बाहेरील भागात नर्सरी ते पाचवी पर्यतची शाळा शाळादेखील उभी करण्यात आली आहे. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी व आजूबाजूच्या परिसरातील गावांतील मुलांसाठीही शाळा चालू राहील. चंद्रपूरच्या वैभवात भर टाकणारे सैनिकी शाळेची ही वसाहत पूर्णत्वाकडे येत असून यामुळे चंद्रपूर सैनिकी शाळेच्या भारताच्या नकाशावर येणार आहे. एक जूनपासून या ठिकाणच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार असल्याचेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.