वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार

0
10

मोहाडी,दि.21ःःतालुक्यातील वरठी ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यासाठी सदस्या शुभांगी येळणे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशीत खंडविकास अधिकार्‍यांनी दोषी ठरविल्याने कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत वरठी येथील तक्रारीसंदर्भात खंडविकास अधिकार्‍यांनी अभिलेख पाहणी तपासणी केले असता ग्रामपंचायतने तुरटी खरेदीसाठी नियमाप्रमाणे ५ हजार रुपयांपेक्षा अधिक व ३ लक्ष रुपयांपर्यंत किमतीच्या साहित्य खरेदीसाठीचे कोटेशनपद्धतीचा अवलंब केला नसल्याचे दिसून आले. कोणतेही दरपत्रक घेण्यात आले नाही. बांधकाम साहित्य खरेदीचे निविदेसंदर्भात प्रसिद्धी दिल्याचे दिसून आले नाही. सदर कारवाईमुळे बाजार मुल्य तपासणी व ग्रा. पं. ला स्पर्धात्मक दराचा लाभ झालेला नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २0११ नुसार खरेदी संदर्भात सबंधितांनी नियोजन केल्याचे दिसून आले नाही. १४ वित्त आयोगाचे नमुना १५ ला तुरटीचा साठा नोंद न करता प्रमाणक क्र. ७ ची वस्तू पाणीपुरवठा नमुना १५ ला केलेली आहे. उर्वरित प्रमाणके क्र. १0 व १४ व २३ वरील साठय़ाची नोंद नमुना – १५ ला आढळून आली नाही. त्यामुळे याचा उपयोग झाला किंवा नाही, असे संशयास्पद असून झालेला खर्च संशयास्पद आहे. खरेदी पुर्वीच देयके दिल्याचे दिसून आले.
याप्रकरणी सरपंच येळणे यांनी आपले कर्तव्य करण्याबाबत दुर्लक्ष केल्याबद्दल कारवाईसाठी पात्रआढळून येतात तसेच तत्कालीन सचिव ए. एन. धमगाये यांनी कामात अनियमितता, निष्काळजीपणा केलेला असल्याने ते महाराष्ट्र जि. प जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४ नुसार कार्यवाहीसाठी पात्र आढळून येत असल्याचे चौकशीत खंडविकास अधिकार्‍यांनी नमूद केले आहे. सदर अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांना पाठविला आहे.