तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड

0
33

नागपूर,दि.21ः-आरपीएफच्या पथकाने पथकाने तामिलनाडू आणि दक्षिण एक्स्प्रेसवर धाड मारून ७ हजार १५७ रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच दक्षिण एक्स्प्रेसमधून संशयाच्या आधारावर दोघांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांच्याजवळ दारूच्या बाटल्या आढळल्या.आशीष जाट (३९) व राजेंद्र जाट (३५), दोन्ही रा. जबलपूर, अशी तस्करी करणार्‍या दोघांची नावे आहेत. या दोन्ही कारवाया बुधवारी सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर करण्यात आल्या.
आरपीएफच्या पथकाने मद्य तस्कराविरुध्द धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. नियमीत कारवाई होत असल्याने मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, तस्करी थांबत नाही.आरीपएफचे पथकही तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी नियमीत पेट्रोलिंगवर असतात. चांगले नेटवर्क असल्याने दारू तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले जात आहेत. बुधवारी दुपारच्या सुमारास आरपीएफचे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, उषा तिग्गा, आरपीएफ जवान विकास शर्मा, कामसिंग ठाकूर, जरवीरसिंह आणि सुषमा ढोमणे यांच्यासह राज्य उत्पादन शुक्ल विभागाच्या कर्मचार्‍यांनी फलाट क्रमांक २ वर थांबलेल्या १२६२२ तामिलनाडू एक्स्प्रेसवर धाड मारली. यावेळी त्यांनी डब्यांचा ताबा घेतला. सर्व डब्यांची झाडाझडती घेतली असता एस-८ बोगीत एक बेवारस बॅग आढळली. बॅगविषयी बोगीतील प्रवाशांना विचारपूस केली. मात्र, बॅगचा मालक पुढे आला नाही. त्यामुळे बॅग उतरवून तपासणी केली असता, त्यात २ हजार ५९७ रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या.
दुसरी कारवाई सायंकाळी फलाट क्रमांक ३ वर करण्यात आली. १२७२२ दक्षिण एक्स्प्रेस फलाट क्रमांक ३ वर थांबली असता पथकातील सदस्यांनी डब्यांची झाडाझडती घेतली. मात्र, काहीच मिळाले नाही. अखेर गाडी सुटण्याची वेळ झाली होती. दरम्यान जनरल बोगीत आशिष आणि राजेंद्र चढत असताना संशयाच्या आधारावर चौकशी केली असता त्यांच्याकडे दारू असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडे ४ हजार ५६0 रुपये किंमतीच्या ४८ दारूच्या बाटल्या मिळून आल्या. दोन्ही प्रकरणात आरपीएफने कायदेशिर कारवाई केल्यानंतर आरपीएफ निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार ७ हजार १५७ रुपये किंमतीचा मुद्देमालासह आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द करण्यात आले.
ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात करण्यात आली. या कारवाईत उपनिरीक्षक रामनिवास यादव, शेषराव पाटील, प्रमोद रामटेके आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आणि कर्मचार्‍यांचा समावेश होता.