शिवसैनिकांनी फोडली ऐरोलीचे आमदार संदीप नाईकांची ‘रेंज रोव्हर’ गाडी

0
17

मुलुंड(शेखर भोसले)दि.01 मार्चःःमहाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांचे सुपुत्र आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हर या अलिशान गाडीवर आज येथील एका कार्यक्रमास्थळी शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचे सूत्रांकडून समजले. संदीप नाईक हे माजी खासदार संजीव नाईक यांचे लहान भाऊ असून ऐरोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.

ऐरोलीमध्ये महानगरपालिकेतर्फे सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे. या सभागृहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्थानिक शिवसेना नगरसेवकाला आमंत्रित करणे आवश्यक असते. मात्र संदीप नाईक यांनी स्थानिक शिवसेना नगरसेवकाला आमंत्रण दिले नाही, असा आरोप शिवसैनिकांतर्फे करण्यात येत आहे.त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांची राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बाचाबाचीत व नंतर झालेल्या झटापटीत शिवसैनिकांनी थेट आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हर या महागड्या गाडीवर हल्ला केला. गाडीच्या काचा फोडल्या. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली.या हल्ल्यात सुदैवाने राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांना कोणतीही दुखापत झाली नाही व त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना सुखरूपपणे तेथून बाहेर काढले . या प्रकारानंतर ऐरोली मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे .