वयोवृद्ध कलावंतांच्या भजन आंदोलनाने जिल्हा परिषद परिसर दणाणला

0
26

जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर व सभापती सौ.शीलाताई निखाते यांची भेट; बहुजन टायगर युवा फोर्स च्या प्रयत्नास यश.
नांदेड,दि.02ः – जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंतांना समान न्यायाने मानधन तसेच पेन्शन लागू करण्याच्या प्रमुख मागण्यासह जिल्हा परिषदेतील कर्मचारी यांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त,सेवावर्ग रद्द करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहण्याची ग्वाही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पाटील जवळगांवकर यांनी दिल्याने बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष ञिरत्नकुमार भवरे यांनी वृद्ध कलावंतांना सोबत घेऊन सुरु केलेले जिल्हा परिषदेसमोरील भजन आंदोलन स्थगित केले.
वृद्ध कलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांसह जिल्हापरिषद कार्यक्षेञातील विभागनिहाय संवर्गनिहाय अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्ती,सेवावर्ग व अतिरिक्त कारभार तात्काळ रद्द करावेत यासाठी बहुजन टायगर युवा फोर्सचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार भवरे कामारीकर यांनी वेळोवेळी निवेदन देऊनही न्याय मिळत नसल्याचे बघत आज शनिवार(दि.2) ला जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन आंदोलन सुरु केले.आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगांवकर व समाजकल्याण विभागाच्या सभापती शीलाताई निखाते यांनी या भजन आंदोलनास भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
मानधन लागू करण्याकरीता वृद्ध कलावंतांची निवड चाचणी परीक्षा घेऊन करण्यात यावी.तसेच,तालुकानिहाय निवड करुन समान पद्धतीने मानधन देण्यात यावे,मानधनात वाढ करावी,वृद्ध कलावंतांना पेन्शन, एस.टी. तसेच रेल्वेत मोफत प्रवासाची सवलत, वृद्ध कलावंतांच्या पाल्यांना मोफत शिक्षण तसेच तालुक्याच्या ठिकाणी कला भवन असावे, वृद्ध कलावंतांना मोफत घरकुल देण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांसोबत शासनाच्या विविध योजनांच्या प्रचार आणि प्रसाराकरीता योगदान देणार्‌या कलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात यावे या मागण्यांचा समावेश होता.
ञिरत्नकुमार भवरे यांच्या नेतृत्वाखालील या भजन आंदोलनात सौ.लक्ष्मीबाई मिरासे,केवळाबाई वाढवे,संघटनाप्रमुख रघुनाथ पोतरे,प्रदेश प्रवक्ता लक्ष्मणराव मा.भवरे, डाॅ.मनोज राऊत, भिमशाहीर चंद्रकांत धोटे, शाहीर व्यंकटराव बेटकबिलोलीकर,शाहीर नरेंद्र दोराटे,शाहीर बापुराव जमधाडे,शाहिर रवि भवरे,शाहीर शंकर गायकवाड,बालाजी बोंडले,कानबा पोपलवार, डाॅ.एस.एस.वाठोरे, शिवाजी डोखळे,जळबा जळपते,माधव प्रधान, केशव माने,परमेश्वर जमधाडे,हिरामण जाधव, मानेजी मुपडे,एकनाथ रेडे, आनंदा तारु,गोविंद शिंदे बालाजी वाढवे, भिमराव पाटील आदींसह जिल्हाभरातील सर्वच स्तरातील लोककलावंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.