श्रीरामपूरवासीय आंदोलनावर ठाम,तोंडी नव्हे,लेखी हवे

0
18

सडक अर्जुनी,दि.02 मार्च : तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती व झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा इशारा प्रशासनाला या गावातील पूर्वाश्रमीच्या श्रीरामपूरवासीयांनी देत गेल्या सहा दिवसांपासून जंगलातच आंदोलन सुरू केले आहे.त्यातच आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (दि.१) आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे बोलविण्यात आले होते. मात्र तिथे सुध्दा ठोस नव्हे तर तोंडी आश्वासन मिळाले.जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन दिले जात नाही,तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही असा पवित्राच आंदोलकांनी घेतल्याची माहिती सरपंच भरत पंधरे,आंदोलक युवक किशोर शेंडे यांनी दिली.या आंदोलकांच्या मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी माजी खासदार व अखिल भारतीय शेतमजूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले हे उद्या 3 मार्चला सकाळी 10 वाजता आंदोलनस्थळी येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

मुंबई मंत्रालयात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्ताना मंजूर १० लाखापैकी उरलेली 1 लाख 64 हजाराची रक्कम देण्याचे मंजुर करण्यात आले.तसेच स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्याचे ठरविण्यात आले.मात्र प्रकल्पग्रस्तांना दाखला देण्याच्या मुद्द्यावर एकमत होऊ शकले नसल्याची माहिती बैठकिला हजर राहिलेले सरपंच भरत पंधरे यांनी दिली.याबैठकीत प्रकल्पग्रस्त परिवारातील एका मुख्य व्यक्तीला प्रकल्पग्रस्ताचा दाखल देण्याचे मंजूर झाले.परंतु आंदोलकांना ही मागणी मान्य नसून आज वयाची 18 वर्ष जे पुर्ण झालेत त्यांना व विभक्त कुटुबांना प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवर ठाम आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या नावात बदल करणे, गाव वसाहत 9.30 हेक्टर जमीन श्रीरामनगर च्या नावे मंजूर करणे, पुनर्वसित नागरिकांच्या नावे घर पट्टे देण्यास मंजुरी देण्यात आली.यापुर्वी याठिकानी सरकार नाव होते ते आता प्रकल्पग्रस्त कुटूबांचे नाव करण्यात येणार आहे. बैठकीला वनविभागाचे प्रधानसचिव विकास खरगे, वनविभागाचे अधिकारी सुनील इलमकर, संजय डोडल, स्वप्नील देशकर,गोंदियाचे उपवनसंरक्षक एस .युवराज,दिव्या भारती,श्रीरामपूरचे सरपंच भरत पंधरे, प्रकाश रहिले, जागेश्वर चांदेवार आदीं उपस्थित होते.