जनतेचा धारिवाल कंपनीवर मोर्चा

0
12

चंद्रपूर,दि.३ : एमआयडीसी परिसरातील १३ गावांतील नागरिक व युवकांनी विविध समस्यांना घेऊन शनिवारी ताडाळी एमआयडीसीतील धारिवाल कंपनीवर धडक मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान झालेल्या वाटाघाटीत येत्या १५ दिवसांत बैठकीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या मागण्या सोडविण्याची हमी कंपनी व्यवस्थापनाने दिली. ही जबाबदारी चंद्रपूर तहसीलदार व पडोली ठाणेदाराने घेतल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.

ताडाळी येथे असलेल्या धारिवाल कंपनीने स्थानिक नागरिकांनाच नोकरी द्यावी. सीएसआर निधीचा वापर युवक व महिलांच्या सक्षमीकरणासाठी करावा. कंपनीतून अवैधरित्या होणारी जडवाहतुक बंद करण्यात यावी. प्रदूषण रोखण्याकरिता उपाययोजना कराव्यात. प्रदूषणामुळे होणाऱ्या शेतपिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील जैन भवन परिसरातून ताडाळी टी पार्इंटपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. यानंतर आठ-दहा बैलबंडीच्या माध्यमातून मोर्चा धारिवाल कंपनीच्या प्रवेशद्वारावर पोहचला. मोर्चाचे स्वरूप पाहुन मोर्चा प्रवेशद्वारावरच अडविण्यात आला. शिष्टमंडळाने आत जावून कंपनी व्यवस्थापनाला निवेदन द्यावे असा प्रस्ताव किशोर जोरगेवार यांनी फेटाळून लावत व्यवस्थापनाने मोर्चाला सामोरे येऊन निवेदन स्वीकारावे व मागण्या पूर्ण कराव्यात, अशी भूमिका घेतली. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर कंपनी व्यवस्थापनासह तहसीलदार भास्करवार हे मोर्चाला सामोरे गेले. त्यांनी किशोर जोरगेवार व मोर्चकऱ्यांसोबत वाटाघाटी केल्या. यामध्ये येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन मागण्यांवर चर्चा करण्याची ग्वाही कंपनी व्यवस्थापनाने दिली.या बैठकीची जबाबदारी तहसीलदार भास्करवार व पडोलीच्या ठाणेदार ढाले यांनी घेतल्याने मोर्चेकरी शांत झाले. या मोर्चात परिसरातील १३ गावातील नागरिकांसह बेरोजगार युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.