उपोषणकर्त्या चार महिलांची प्रकृती खालावली

0
22

भंडारा, ,दि.04ःः : तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा गावातील २६ एकर जागेवर १९८२ पासून अशोक लेलँड कारखान्याने केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गत तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु आहे. रविवारला उपोषणकर्त्या चार महिलांची प्रकृती खालावली. अद्यापही अधिकाऱ्यांनी या उपोषणाकडे पाठ फिरविल्यामुळे उपोषण चिघळण्याची शक्यता आहे.सरपंच अनिता शेंडे, दुर्गा मेश्राम, रेखा वासनिक, अनुसया नागदेवे असे प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्त्या महिलांची नावे आहेत. भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत राजेगाव अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा (रिठी) गावातील जमीनीवर अशोक लेलँड कारखान्याने अतिक्रमण करुन पक्के बांधकाम केले. ते अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने देवून चर्चा केली. मात्र तोडगा निघाला नाही. त्यामुळे २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. परंतु कारवाई करण्यात आली नाही. कारखाना व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी, सरपंच अनिता शेंडे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी कारखान्याचे अरविंद बोरडकर यांच्याविरुद्ध अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी. कारखान्यासमोर प्रजासत्ताकदिनी करण्यात आलेल्या मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्यात यावे यासह अन्य मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहेत. सरपंचासह अन्य १३ जणांनी १ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे. यात प्रकृती खालावलेल्या महिलांसह हिवराज शेंडे, प्रणय झंझाड, अनुप शेंडे, छत्रपती सार्वे, आनंदराव गंथाडे, अमरदीप गणवीर, विशाल रामटेके, धर्मेंद्र सुखदेवे, तुकाराम झलके यांचा समावेश आहे.