नागपूर मेट्रो रेल्वेचे गुरुवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

0
20

नागपूर : मेट्रो रेल्वेच्या नागपूर प्रकल्पाचे उद्घाटन उद्या गुरुवार, ७ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविणार आहे. उद्घाटन समारंभ मेट्रो एअरपोर्ट साऊथ स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. त्यामुळे ‘माझी मेट्रो’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.
उद्घाटनप्रसंगी एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहबांधणी व नागरी कामकाज मंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार, आमदार, महापौर आणि अनेक मान्यवर उपस्थित राहतील.कल्पाच्या उद्घाटनापूर्वी दुपारी ३.३० वाजता साऊथ एअरपोर्ट स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १ वर महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पाच्या बांधकामाचा लेखाजोखा दर्शविणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन आणि त्याचवेळी महामेट्रोच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी मेट्रो फिल्म शो दाखविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन नागपूरकरांसाठी सात दिवस सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुले राहील. नागपूर प्रकल्पाच्या बांधकामाची प्रत्यक्ष माहिती नागपूरकरांना प्रदर्शनाच्या माध्यमातून जाणून घेता येईल. पत्रपरिषदेत महामेट्रोचे महाव्यस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.
महामेट्रो ८ मार्चला आभार दिन म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी नागपूरकरांना मेट्रोचा नि:शुल्क प्रवास घडणार आहे. प्रारंभी एकाच बाजूने सीताबर्डी ते खापरी असा १३.५ कि़मी. प्रवास राहणार आहे. त्यानंतर दोन्ही मार्गावर मेट्रो धावणार आहे. ९ मार्चला सकाळी ८ वाजेपासून सीताबर्डी ते खापरी या मार्गावर मेट्रोचा व्यावसायिक प्रवास एक महिना सवलतीचा सुरू होणार आहे. त्याकरिता मेट्रोने कॉमन मोबिलिटी कार्ड जारी केले आहे.उत्तर-दक्षिण कॉरिडोरमध्ये खापरी ते सीताबर्डी मार्गावर खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट आणि सीताबर्डी हे पाच स्टेशन खुले राहणार आहे.