200 नवीन बसचा ताफा लवकरच चंद्रपूर जिल्‍ह्यात दाखल होणार- सुधीर मुनगंटीवार

0
26

11 कोटी रू. खर्चून बांधण्‍यात आलेल्‍या बसस्‍थानकाचा लोकार्पण सोहळा

चंद्रपूर,दि.08 : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात आधुनिक अशा बल्लारपूर बसस्थानकाचे लोकार्पण बुधवारी एका शानदार सोहळ्यात राज्याचे वित्त, नियोजन वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले. एखाद्या विमानतळाला साजेशा या बसस्थानकाला बघायला एकच गर्दी उडाली असून महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असे तालुक्याचे बसस्थानक म्हणून बल्लारपूरचे नावलौकिक होत आहे.

बल्‍लारपूर शहरात 11 कोटी रू. निधी खर्चुन बांधण्‍यात आलेल्‍या अत्‍याधुनिक बसस्‍थानकाचा लोकार्पण सोहळा संपन्‍न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री.मुनगंटीवार बोलत होते. बल्लारपूर येथील देखणे बसस्थानक जनतेच्या सेवेत रुजू झाले आता 200 नवीन बससेचा ताफा लवकरच चंद्रपूर जिल्‍ह्यात दाखल होईल. यावेळी वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, न.प. उपाध्‍यक्षा मिना चौधरी, जिल्‍हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, संतोष तंगडपल्‍लीवार, जिल्‍हा परिषद सदस्‍य संजय गजपुरे, काशिनाथ सिंह, किशोर पंदिलवार, चंद्रपूर मनपाचे स्‍थायी समिती सभापती राहुल पावडे, राज्‍य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्रकुमार पाटील, विभागीय अभियंता राहुल मोडक, कार्यकारी अभियंता नरेंद्र खांडेकर, वास्‍तु विशारद रवी सोनकुसरे आदी उपस्थित होते.

श्री.मुनगंटीवार यांनी या देखण्‍या बसस्‍थानकाच्‍या बांधकाम प्रक्रियेत योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार व्‍यक्‍त केले. 11 कोटी रु. खर्चून बांधण्‍यात आलेले बल्‍लारपुरातील बसस्‍थानक एखाद्या विमानतळासारखे दिसत होते. प्रशस्‍त फलाट मोठे वाहन तळ, प्रसाधनगृहे, सर्व सोयींनी युक्‍त चौकशी कक्ष, पाण्‍याची सुविधा, आकर्षक आसन व्‍यवस्‍था आदींमुळे या बसस्‍थानकाला पंचतारांकित लुक प्राप्‍त झाला आहे. या बसस्‍थानकात दोन मोठ्या झाडांचा वापर रंगसंगतीच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आला असून हे प्रवाशांसाठी सेल्‍फी पॉईंट ठरले आहे.दोन महिन्‍यानंतर जिल्‍ह्यात 200 नवीन बसेसचा ताफा धावणार असून या माध्‍यमातून प्रवाशांना उत्तम सुविधा पुरविण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी जाहीर केला.

श्री. शर्मा यांनी बल्‍लारपूर शहराच्‍या सौंदर्यात भर घालणाऱ्या बसस्‍थानकासह विविध विकास कामांचा झंझावात निर्माण केल्‍याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले. 1995 पासुन आजच्‍या क्षणापर्यंत विकासाचा अविरत प्रवास त्‍यांच्‍या नेतृत्‍वात सुरु आहे. बल्‍लारपूर शहराची ओळख अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍यामुळे जागतिक पातळीवर झाली आहे. विकासकामे आणि लोककल्‍याणकारी उपक्रम यांची सांगड घालत कार्यरत हा लोकनेता या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे याचा आम्‍हाला अभिमान असल्‍याचे ते म्‍हणाले.यावेळी चंदनसिंह चंदेल, देवराव भोंगळे यांचीही भाषणे झाली.यावेळी 12 कोटी 50 लाख रू. किंमतीच्‍या शहरातील विविध विकास कामांचे ई भूमिपूजन करण्‍यात आले. त्‍याचप्रमाणे अटल दिव्‍यांग स्‍वावलंबन मिशन अंतर्गत दिव्‍यांग बांधवांना बॅटरी ऑपरेटेड सायकली वितरीत करण्‍यात आल्‍या. सूत्रसंचालन नासिर खान यांनी केले.