ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटच्या वापरामुळे मतदान प्रक्रियेविषयीचे गैरसमज दूर होतील-दीपक दंडे

0
19
  • प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा
  • जनजागृतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन

वाशिम, दि. ०९ : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाकरिता ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार असल्याने मतदान प्रक्रीयेविषयीचे सर्व गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असे मत वाशिम तहसीलदार कार्यालयातील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार दीपक दंडे यांनी व्यक्त केले. तहसीलदार कार्यालयामध्ये आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित ईव्हीएम-व्हीव्हीपॅट विषयक कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. दंडे म्हणाले, व्हीव्हीपॅटमुळे मतदाराला आपले मत अचूकपणे नोंदविले गेले आहे किंवा नाही, हे पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.  त्यामुळे त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या कार्यपध्दतीची माहिती देण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर प्रात्याक्षिके आयोजित करून मतदारांना माहिती देण्यात आली आहे. तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये सुद्धा जनजागृतीकरिता कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्यामुळे मतदान प्रक्रियेविषयी असलेले सर्व गैरसमज दूर होणार असून या दोन्ही यंत्रांची माहिती सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.कार्यशाळेला उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अरुण कुकडकर यांनी ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या वापरबाबत माहिती  दिली. तसेच यावेळी मतदानाचे प्रात्यक्षिक घेवून ईव्हीएम-व्हीव्हीपॅटची प्रत्यक्ष कार्यपद्धती दाखविण्यात आली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी तलाठी पुंडलिक वैद्य, दत्ता चोपडे यांनी परिश्रम घेतले.