बाघ नदीच्या बॅरेजला लवकरच मिळणार मंजुरी

0
18

गोंदिया,दि.11 : कासा, बिरसोला, जिरूटोला, सतोनासह बाघ नदीच्या काठावरील गावांचे पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे मोठे नुकसान होऊन वाहतूक ठप्प होते. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पुरापासून गावकऱ्यांना वाचविण्यासाठी या क्षेत्रातील विकासकामांना गती देणे आवश्यक आहे. आता लवकरच बाघ नदीवर भव्य बॅरेजला मध्यप्रदेश व महाराष्ट्र शासन मंजुरी प्रदान करेल, असा विश्वास आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केला.कासा येथे १ कोटी ४६ लाख रुपयांच्या सिमेंटीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सभापती रमेश अंबुले, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, चमन बिसेन, विजय लोणारे, प्रकाश रहमतकर उपस्थित होते.सोबतच कोरणीधाट विकासासाठी 25 लाखाचा निधी मंजूर झाला असून विठ्टलरुखमाई मंदिर व बुध्दीस्ट पर्यटन परिसरात सिमेंट रस्ता व गट्टू लावण्याचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी जि.प.अध्य़क्ष सीमा मडावी,सभापती माधुरी हरिणखेडे,जि.प.सदस्य देवंद्र मानकर,केतन तुरकर आदी उपस्थित होते.

अग्रवाल म्हणाले, कासा, बिरसोला, भाद्याटोला आदी गावे पुरामुळे बाधीत होतात. या गावांना जोडणाऱ्या मार्गावर जामुननाला-कचारनाला येथे उंच पुलाची निर्मिती केली. यामुळे पुरामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी झाला आहे. आता बाघ नदीवर भव्य बॅरेजची निर्मिती करून डांगोर्ली-कामठा-कटंगटोलापर्यंत पूर्ण क्षेत्रात हरितक्रांतीच्या माध्यमातून आर्थिक उन्नती आणण्याचा प्रयत्न आहे. लवकरच महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकार बाघ नदीवर आंतरराज्यीय बंधाऱ्याला मंजुरी देणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.