आदर्श आचार संहितेची प्रभावी अमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे

0
41
गोंदिया,दि.11: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता 10 मार्च 2019 रोजी सायंकाळी आचार संहिता लागू झाली असून 11 एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी पहिल्या टप्यात मतदान होणार आहे. आचार संहितेची काटेकोरपणे अमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे यांनी आज (दि.11) सर्व विभाग प्रमुख, नोडल आॅफिसर तथा राजकिय पक्षांची बैठक घेऊन भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेचे पालन करण्याचे निर्देश दिले.
 बैठकीत जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विविध सूचना देऊन आदर्श आचार संहितेच्या कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा वापर राजकीय कारणासाठी केला जाणार नाही असे सांगितले.पुढे म्हणाल्या की सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर, व झेंडे काढून घेण्याची सूचना सर्व नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात आली असून त्यावर कारवाई सुद्धा करण्यात येत आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होईल असे कृती कोणत्या शासकीय विभाग, अधिकारी, कर्मचार्यांच्याकडून होता कामा नये.
उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यसाठी निवडणूक खर्च सनियंत्रण समिती तसेच प्रसारमाध्यम प्रमाणीकरण व सिनियंत्रण समितीसह इतर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज असून आगामी निवडणूका  शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यात येईल.प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेयर व त्यांच्या मांगणीनुसार इतर सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
 सदर बैठकीला  मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपपोलीस अधिक्षक सोनाली कदम, उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड, जिल्हा माहिती विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चौव्हान, जिल्हा प्रशासन अधिकारी व पालिका प्रशासन विनोद जाधव, सहा.अधिक्षक आर.एम पटले, लेखाधिकारी एल.एच बाविस्कर, नायबतह. प्रविण जमधाडे, तसेच राजकिय पक्षाचे जयंत शुक्ला, अशोक चौधरी, केतन तुरकर, अजय गौर आदि उपस्थित होते. नागरीकांच्या विविध प्रश्न तसेच शंका असल्यास 1950@ या टोल फ्री क्रमांकावर तथा अधिक माहितीसाठी www.nvsp.in  तसेच  www.ceo.maharashtra.govt.in या सांकेतीक स्थळावर भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
नागरीकांच्या तक्रारी साठी मोबाईल ऍप
या निवडणूकीत नागरीकांना निवडणूकी संदर्भात तक्रारीसाठी  सीव्हीजील (cVIGIL) या नावाने एंड्राईड मोबाईल ऍप लांच करण्यात आली आहे.  सदर एप्लीकेशन मध्ये रजिस्टर करुन तक्रारदार हे लाईव्ह व्हिडीयो तथा फोटो अपलोड करुन तक्रार करु शकतात. प्राप्त तक्रारी नंतर 100 मि. मध्ये कायर्वाही करण्यात येईल. तसेच तक्रारीसंदर्भात केलेल्या कार्यवाहीची सूचना वेळो-वेळी देण्यात येईल. नागरीकांच्या नाव गुप्त  ठेवण्यासाठी सदर ऍप मध्ये सुविधा देण्यात आली आहे.