गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात १५ लाख ६८ हजार मतदार

0
18

गडचिरोली,दि.11 : निवडणूक आयोगाने रविवारी सायंकाळी लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आचारसंहिता लागू होताच प्रशासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार एकूण १५ लाख ६८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याशिवाय येत्या १५ मार्चपर्यंत नोंदणी करणाऱ्या नवीन मतदारांनाही मतदानाचा अधिकार मिळणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेला जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड ,अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-दुबे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एस.के.चडगुलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
गडचिरोली, अहेरी, आरमोरी, आमगाव,ब्रह्मपुरी आणि चिमुर या सहा विधानसभा मतदार संघातील एकूण १५ लाख ६८ हजार ६२० मतदारांची यादी तयार आहे. त्यात ७ लाख ९४ हजार ७६८ पुरूष तर ७ लाख ७३ हजार ८५० महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय २ तृतीयपंथींचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १८७१ मतदान केंद्र राहणार आहेत. त्यात २८१ केंद्र शहरी भागात तर १५९० केंद्र ग्रामीण भागात राहतील.
जिल्ह्यात गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा आता संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांची संख्या ३३ ने कमी झाल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदार संघातील मतदार मिळून २०१४ मध्ये ७ लाख २८ हजार ११६ मतदार होते. पाच वर्षात ही संख्या ७ लाख ८९ हजार ७४६ वर पोहोचली आहे. येत्या १८ मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल. तेव्हापासून २५ मार्चपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करता येईल. मात्र यात दि.२१ ते २४ दरम्यान होळी, रंगपंचमी, पाडवा, चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग चार दिवस सुटी आल्यामुळे एकूण ४ दिवस नामांकन दाखल करण्यासाठी मिळणार आहेत.
पहिल्यांचा निवडणुकीत ईव्हीएम मशिनसोबत व्हीव्हीपॅटचा वापर होणार असल्यामुळे त्याचे प्रात्यक्षिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदारांना दाखविण्यात आले. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी सकाळी ६ वाजता ५० लोकांना याचे पुन्हा प्रात्यक्षिक दाखविले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतदार केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअरचीही सोय राहणार आहे.
ज्या शिक्षकांची ड्युटी दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये लागली आहे त्यांना यातून वगळल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.