लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-हृषीकेश मोडक

0
13
????????????????????????????????????

वाशिम, दि. १२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ चा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी तर अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबत निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी मोडक यावेळी म्हणाले, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील कारंजा आणि वाशिम या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांकारिता ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर अकोला लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अधिसूचना १८ मार्च रोजी तर अकोला लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अधिसूचना १९ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाकरिता नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक २५ मार्च आहे, तर अकोला लोकसभा मतदारसंघासाठी २६ मार्च आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील नामनिर्देशनपत्रांची छाननी २६ मार्च रोजी तर अकोला लोकसभा मतदारसंघाची छाननी २७ मार्च रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी २८ मार्च तर अकोला लोकसभा मतदारसंघासाठी २९ मार्च असा आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी यवतमाळ व अकोला येथे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाशिम जिल्ह्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड विधानसभा क्षेत्रातील १ लाख ५७ हजार ६०९ पुरुष, १ लाख ४१ हजार ३९३ महिला आणि १ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ९९ हजार ३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील वाशिम विधानसभा क्षेत्रातील १ लाख ७८ हजार ५० पुरुष, १ लाख ६२ हजार ७५१ महिला आणि १ तृतीयपंथी असे एकूण ३ लाख ४० हजार ८०२ तर कारंजा विधानसभा क्षेत्रातील १ लाख ५३ हजार ६३६ पुरुष मतदार, १ लाख ४१ हजार १०६ महिला मतदार आणि २ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ९४ हजार ७४४ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या अकोला आणि यवतमाळ लोकसभा क्षेत्रात ४ लाख ८९ हजार २९५ पुरुष, ४ लाख ४५ हजार २५० महिला आणि ४ तृतीयपंथी असे एकूण ९ लाख ३४ हजार ५४९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे श्री. मोडक म्हणाले.

आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय ४ फिरती पथके अशी एकूण १२ पथके गठीत करण्यात आल्याचे सांगून श्री. मोडक पुढे म्हणाले, जिल्ह्यात स्थिर सर्वेक्षणासाठी ९ पथके गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ३ पथके गठीत करण्यात आली असून ही पथके जिल्ह्यात अवैध दारू, पैसा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात येणार नाही, याची दक्षता घेणार आहेत. आचारसंहिताबाबतच्या तक्रारींसाठी सी व्हीजील (C VIGIL) हे अॅप भारत निवडणूक आयोगाने तयार केले आहे. नागरिकांना आचारसंहितेबाबतच्या तक्रारी या अॅपवर करता येणार आहेत. तक्रारदारांना या अॅपवर आचारसंहितेच्या उल्लंघनाचे फोटो आणि व्हिडीओ देखील टाकता येणार आहेत. मा. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात जिल्हा संपर्क कक्ष तयार करण्यात आले आहे. मतदारांना १९५० या हेल्पलाईनद्वारे जिल्हा संपर्क कक्षात संपर्क साधून आपल्याला आवश्यक माहिती प्राप्त करून घेता येणार आहे.

जिल्ह्यात येणाऱ्या दोन लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघात एकूण १ हजार ४३ मतदान केंद्रे राहणार आहेत. यामध्ये मतदार वाढल्यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १० टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे वेब कास्टिंग केले जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

अपर पोलीस अधीक्षक श्री. चव्हाण म्हणाले, जिल्ह्याच्या सीमेवर विविध ठिकाणी चेकपोस्ट सुरु करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी श्वानपथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. अवैध धंद्यांवर धाडी मारण्यासाठी १३ विशेष पथके व वाशिम शहरासाठी ३ असे एकूण १६ पथके गठीत करण्यात आली आहेत. भयमुक्त व शांततापूर्ण वातावरणात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कार्यान्वित

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कार्यान्वित करण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, या समितीच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या राजकीय जाहिराती, पेड न्यूज यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सोबतच समाजमाध्यमांवरील जाहिरातींवर देखील लक्ष ठेवण्यात येणार असून उमेदवारांनी समाजमाध्यमांच्या खात्याची माहिती देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.