खरचं स्वातंत्र्य झोपडीपर्यंत पोहोचलयं का?-डाॅ.सबनीस

0
21

चंद्रपूर,दि.18ः- आंबेडरवादी साहित्य चळवळीच फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहोचले आहे. तीन शाही म्हणजे आंबेडकरवाद आहे. देश आजच्या घडीला विस्कळीत झाला आहे. सर्व धर्माच्या पावित्र्यावर विकृतीचे पीक आले आहे. धर्माचे लोकचं धर्माचं विकृतीकरण करत आहेत. डॉ. बाबासाहेबांनी संविधान दिल. या देशात वेदनेतून आंबेडकरवाद निर्माण होत आहे. मात्र देशात व्यक्तीवाद वाढत आहे. त्यामुळे अजुनही खरच स्वातंत्र्य गरीबांच्या घरापर्यंत पोहोचले नाही, हे सत्य असल्याचे प्रतिपादन डॉ. श्रीपाल सबनिस यांनी केले.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळद्वारा पहिले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन चिमूर येथील शेतकरी भवन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी येथे शनिवारला आयोजित साहित्य संमेलनाच्या उद््घाटन दरम्यान मंचावरून मार्गदर्शन करतांना डॉ. श्रीपाल सबनिस बोलत होते. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्घ साहित्यिक व विचारवंत प्रा.दीपककुमार खोब्रागडे, सुप्रसिद्घ विचारवंत व साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस होते.तर प्रमुख अतिथी सुप्रसीध्द नाटककार, लेखक प्रेमानंद गज्वी, विशेष उपस्थितीत संघरामगीरी संघनायक भिक्कू संघ पु.भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, स्वागताध्यक्ष प्रसिद्ध कवी व लेखक अँड. भुपेश पाटील, सहस्वागताध्यक्ष सुरेश डांगे शिक्षक, डॉ.धनराज खानोरकर, झाडीबोली साहित्यिक ना.गो.थुटे, आत्माराम ढोक, विद्याधर बन्सोड, प्रा.वामन शेळमाके, किशोर गजभीये, शुध्दोंधन कांबळे, महेश मोरे आदी उपस्थतीत होते.
क्रांतिभूमीत दोन दिवस चालनार्‍या साहित्य संमेलनादरम्यान इंदीरा नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राष्ट्रसंत साहित्यनगरीपर्यंत प्रथम संविधान गौरव रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी तुकडोजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, यांची वेशभूषा करून नागरिकांचे लक्ष वेधले होते.परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून हुतात्मा स्मारक येथील हुता हुतात्मांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांच्या हस्ते महान विभूतीच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संसद भवन यांच्या तैलचित्राचे अनावरण करून क्रांतिभूमीतील पहिल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. परिसरातील ग्रंथालय प्रदर्शनाचे उद््घाटन करण्यात आले.दरम्यान आंबेडकरी चळवळीतील साहित्यिक व काव्यकार डॉ.धनराज खानोरकर यांच्या ‘मास्तर माती’चे काव्यसंग्रह, डॉ. भुपेश पाटील यांच्या जेव्हा गाव पेटून उठतो तेव्हा, भानुदास पोपटे यांच्या राष्ट्रीय अभंगवाणी काव्यसंग्रह व विद्याधर बन्सोड, अनंता सूर, आदी साहित्यिकांच्या दहा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक सुरेश डांगे यांनी केले. संचालन गीता रायपुरे यांनी केले. आभार शारदा गेडाम यांनी मानले. साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवसी कार्यक्रमाला विदर्भातील बहुसंख्य साहित्यिक, कवी, नागरिक उपस्थित होते.