निवडणूक खर्च विषयक पथकांची कार्यवाही गतिमान करा – नागेंद्र यादव

0
19
वाशिम, दि. ०४ : आगामी लोकसभा निवडणुकीत मद्य व पैशाचा वापर रोखण्यासाठी भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी), व्हीडीओ सर्व्हेक्षण पथक (व्हीएसटी) यांनी आपली कार्यवाही गतिमान करावी. भरारी पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना अकोला लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक नागेंद्र यादव यांनी केल्या. रिसोड येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. एस. राऊत, निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. खिल्लारे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी व्यंकट जोशी, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, युसुफ शेख, रिसोडचे तहसीलदार राजू सुरडकर, मालेगावचे तहसीलदार रवी काळे, सहाय्यक खर्च निरीक्षक एस. जी. कडेकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप यांची उपस्थिती होती.
श्री. यादव म्हणाले, सर्व स्थिर सर्वेक्षण पथकांनी वाहन तपासणीची गती वाढवावी. तसेच चारचाकी वाहनांसोबतच बसेस, दुचाकी वाहनांची सुद्धा अचानक तपासणी करावी. त्याचबरोबर भरारी पथकांनी सुद्धा अचानकपणे वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांची तपासणी करावी. पेट्रोलपंप, हॉटेल, धाबा अशा ठिकाणी भरारी पथकांनी भेट देवून तपासणी करावी. निवडणूक काळात मद्य, पैसा याचा वापर होणार नाही, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने व पोलीस विभागाने विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
रिसोड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी नियुक्त खर्च निरीक्षण पथक, लेखा पथक, भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी), व्हीडीओ सर्व्हेक्षण पथक (व्हीएसटी), व्हीडीओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा यावेळी श्री. यादव यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी निजामपूर येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी) येथे भेट देवून तेथील कामकाजाची माहिती घेतली.