निवडणूकीची कामे यंत्रणांनी संवेदनशीलपणे करावी- डॉ.पार्थ सारथी मिश्रा

0
15

गोंदिया,दि.४: भंडारा-गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने चांगली तयारी केली आहे. भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणांनी संवेदनशीलपणे कामे करावीत. असे प्रतिपादन भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नोडल अधिकाऱ्यांच्या सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ.मिश्रा बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.मिश्रा म्हणाले, ११ एप्रिल हा मतदानाचा दिवस असल्यामुळे तो राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी विविध यंत्रणेच्या माध्यमातून निवडणूकीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडायची आहे. निवडणूकीसाठी कामे करतांना यंत्रणेतील सर्वांनी स्वत:ला झोकून देवून काम करावे. ही कामे करतांना कोणाच्या हातून चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूकीच्या काळातील प्रशिक्षण ते मतमोजणी या दरम्यानच्या कालावधीत अत्यंत सुक्ष्म नियोजनातून आपआपली जबाबदारी पार पाडावी. प्रसार माध्यमे या काळात अत्यंत सक्रीय असतात. जर काही चूक झाली तर ती चूक ते लक्षात आणून देतात, पण चूक होणारच नाही याची दक्षता निवडणूकीच्या काळात प्रत्येकाने घेवून काम करावे. जिल्ह्यात अवैध दारुची वाहतुक होणार नाही यासाठी उत्पादन शुल्क विभागाने दक्ष राहून काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणूक ही सामुहिक जबाबदारी असल्याचे सांगून डॉ.मिश्रा म्हणाले, या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करणे हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. निवडणूकीच्या काळात निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजकीय बाबीवर बोलू नये. जिल्ह्यात निवडणूका शांततेत पार पाडण्याची परंपरा यापुढेही कायम राहावी. निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या प्रत्येकाने निवडणूकीच्या अटी व नियमांचे वाचन करुन पालन केले पाहिजे. जिल्ह्यात नविन मतदार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांच्यासह सर्व मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले पाहिजे. निवडणूक यंत्रणेतील सर्वांनी कठोर परिश्रम घेवून ही निवडणूक यशस्वी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाची तसेच मतदार नोंदणीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीत झालेल्या मतदानाची माहिती देखील त्यांनी दिली. या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्ह्यात ९ सखी मतदान केंद्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा, उपलब्ध असलेल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची माहिती तसेच निवडणूकीसाठी लागणारे मनुष्यबळ, वाहतुक व्यवस्था याबाबतची माहिती त्यांनी दिली.
डॉ.दयानिधी यांनी मतदार जागृती अभियानाअंतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आल्याचे सांगितले. दिव्यांग मतदारांसाठी विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात आल्याचे सांगून डॉ.दयानिधी यांनी दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर व रॅम्सच्या व्यवस्थेसह अन्य सुविधा मतदान केंद्रावर दिव्यांगांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती कदम, नोडल अधिकारी सर्वश्री उपजिल्हाधिकारी राहूल खांडेभराड, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री.जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राठोड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा खनिकर्म अधिकारी राजविलास गजभिये, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.तांबे यांची उपस्थिती होती.
०००००