कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये- डॉ.पार्थ सारथी मिश्रा

0
20

कारंजा येथे मतदार जागृती कार्यक्रम
गोंदिया, दि.५ : येत्या ११ एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. कारंजा येथील सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. दिव्यांग व्यक्तीला सुध्दा मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. असे प्रतिपादन भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थ सारथी मिश्रा यांनी केले.
४ एप्रिल रोजी गोंदियाजवळील कारंजा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात आयोजित मतदार जागृती कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून डॉ.मिश्रा बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राठोड, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.मिश्रा पुढे म्हणाले, इथल्या सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. लोकशाही व्यवस्थेत मतदान करुन आपल्याला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. मतदानाबाबतची उदासीनता दूर करुन मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन आपला हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत करावी असे त्यांनी सांगितले.
डॉ.बलकवडे यांनी उपस्थित महिलांना मतदानाची तारीख कोणती आहे. मतदार ओळखपत्र सर्वांकडे आहे का याबाबत विचारणा केली. जर मतदार ओळखपत्र नसेल तर मतदानासाठी इतर अकरा प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. गावातील आजी-आजोबा, दिव्यांग व्यक्ती यांचेसह सर्व मतदारांनी मतदान करुन लोकशाही बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील लोकसभेच्या निवडणूकीत झालेल्या मतदानापेक्षा या निवडणूकीत मोठ्या संख्येने मतदान झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कारंजा येथील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत स्थापीत हिमालय ग्रामसंस्थेच्या २० बचतगटातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बचतगटातील महिलांच्या हाती मतदार जागृतीचे विविध फलक होते. गावातील प्रथमच मतदान करणारे युवक-युवती देखील आपले मतदार ओळखपत्र घेवून उपस्थित होते. यावेळी त्यांनी निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेसोबत छायाचित्र काढली. सुभाष कलापथक मंडळाच्या सुभाष मेश्राम व त्याच्या कलावंतांनी कलापथकाच्या माध्यमातून लोकशाहीचे महत्व पटवून देवून प्रत्येक मतदाराने मतदान करणे किती आवश्यक आहे हे मनोरंजनातून प्रबोधन करुन सांगितले. यावेळी कारंजा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅटद्वारे मतदानाचे प्रात्यक्षिके केली. याबाबत असलेल्या त्यांच्या शंकाचे समाधान उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी मानले.