अपक्ष व बसप उमेदवाराना लोकवर्गणीसोबतच मतदानाचेही आश्वासन

0
21

साकोली,दि.07 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा दिग्गज राजकारणी लोकांचा मतदारसंघ.प्रफुल पटेल व नाना पटोले हे या मतदारसंघातील मोठे नेते,त्यांच्यापाठोपाठ डाॅ.खुशाल बोपचे,प्रा.महादेवराव शिवणकरांचाही प्रभाव राहिलेला हा मतदारसंघ होय.पण या निवडणुकीत यापैकी कुणीच रिंगणात नसले तरी निवड़णुक चर्चेत आली ती भाजपमधून बंडखोरी केलेल्या किसान गर्जेनेचे संस्थापक इंजि.राजेंद्र पटले व बसपने पहिल्यांदा दिलेल्या महिला उमेदवार डाॅॅ.विजया नंदुरकर यांच्यामुळे.इंजि.राजेंद्र पटले हे अपक्ष निवडणुक रिंगणात उतरले असून आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांच्यासाठी सर्वसामान्य नागरिकांसह समाजातील काही मान्यवरांनीही त्यांना लोकवर्गणी करुन त्यांच्या प्रचारात मदत करण्यास सुरवात केली आहे.त्याचप्रकारे बसपच्या उमेदवार डाॅ.विजया नंदुरकर यांनीही लोकवर्गणीसाठी आवाहन केले असून त्यांनाही नागरिक मदत करु लागले आहेत.

अपक्ष राजेंद्र पटले हे ट्रक्टर निवडणुक चिन्हावर तर बसपच्या डाॅ.विजया नंदुरकर या हत्ती निवडणुक चिन्हावर रिंगणात आहेत.या दोघापैकी बसप उमेदवारांचा प्रचार हा मोठ्याने दिसून येत आहे.त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आणि बसपचे पदाधिकारी यांचे नियोजन असल्याने त्या मुख्य गावापर्यंत पोचू लागल्या आहेत.सोबतच सोशलमिडिया फेसबुकच्या माध्यमातून लाईव प्रसारणातून मतदारापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.तर दुसरीकडे इंजि.राजेंद्र पटले यांचा प्रचार पाहिजे तसा गावागावपर्यंत पोचलेला नसला तरी सोशल मिडीयातून त्यांचा प्रचार चालला आहे.त्यांनी नुक्कड सभांना खुप कमी महत्व दिल्याने त्यांच्या प्रचाराचा जोर दिसून येत नाही.तर गावागावात जाऊन ते महत्वाचे मानकरी असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गाठीभेटीच्या माध्यमातूनच आपला प्रचार करीत आहे.या दोन्ही उमेदवारांसाठी मात्र लोकवर्गणी हा मुद्दा महत्वाचा ठरला आहे.त्यातही बसपच्या उमेदवार या प्रचारात पटलेंच्या तुलनेत आघाडीवर असल्याने त्याचा फटका काँग्रेस राष्ट््रवादीला बसण्याची शक्यता दिसून येत आहे.