यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ मतदानाकरिता मतदान पथके आज होणार रवाना

0
51

वाशिम, दि. ०९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात गुरुवार, ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघात जिल्ह्यातील वाशिम व कारंजा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या क्षेत्रात येणाऱ्या ७१७ मतदार केंद्रांसह १३ सहाय्यकारी मतदार केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यादृष्टीने जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून आज मतदान पथके (पोलिंग पार्टी) रवाना होणार आहेत.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात एकूण २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट व प्रत्येकी एका कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. याकरिता विधानसभा मतदारसंघनिहाय १२० टक्के मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मतदान पथकांमध्ये २९२० अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  मतदान पथके व मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी ७२ बसेस, ०३ मिनी बसेस व ६१ जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व वाहनांना जीपीएस बसविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ६ लाख ४३ हजार मतदार बजाविणार हक्क

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वाशिम जिल्ह्यातील कारंजा व वाशिम विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. लोकसभा निवडणुकीत वाशिम विधानसभा मतदारसंघातील ३ लाख ४५ हजार ३२० व कारंजा विधानसभा मतदारसंघातील २ लाख ९८ हजार ६६३ असे एकूण ६ लाख ४३ हजार ९८३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.