नक्षलग्रस्त भागात 88 कंपन्याचे जवान,तीन हेलीकाॅप्टर्स

0
12

गोंदिया,दि.10 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आता एक दिवसावर येऊन ठेपल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यात निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्याबरोबरच मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवळपास ११० कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ११ हजारांवर जवानांचा समावेश असून मतदान होईपर्यंत त्यांना विभागवार नेमण्यात येणार आहे.त्यातच उद्या गुरुवारी नक्षलग्रस्त भागात होणाऱ्या मतदानासाठी ८८ सुरक्षा कंपन्यांसह वायू दलाची एमएस-१७ ही तीन हॅलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत.गडचिरोलीत सीआरपीएफच्या ३५ तर एसआरपीएफच्या २८ आणि गोंदियामध्ये सीआरपीएफच्या १५ तुकड्या तैनात केल्या आहेत.दंतेवाडा येथील घटनेनंतर गोंदिया व गडचिरोली पोलीसांनी हायअलर्ट घोषीत करुन बंदोबस्तात वाढ केली आहे.

येथील निवडणूक बंदोबस्तावर पर्यवेक्षण करण्यासाठी नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख अप्पर महासंचालक राजेंद्र सिंह तर गोंदियासाठी या अभियानाचे महानिरीक्षक शरद शेलार यांना नेमण्यात आले असल्याचे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, तेथील आयुक्तालय/ अधीक्षक कार्यक्षेत्रातील पोलिसांना तीन दिवसांच्या कालावधीतील साप्ताहिक सुट्टी व वैद्यकीय रजा वगळून अन्य रजा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय संबंधित हद्दीमध्ये निवडणूक होईपर्यंत नाकाबंदी लावली जाणार आहे