रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

0
11
????????????????????????????????????

वाशिम, दि. १८ : जिल्ह्यातील रिसोड विधानसभा क्षेत्राचा समावेश अकोला लोकसभा मतदारसंघात होतो. यामध्ये रिसोड व मालेगाव हे दोन तालुके समाविष्ट आहेत. आज दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान झाले.आज सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली. गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे आज तुलनेने तापमान कमी होते. अनेक मतदान केंद्रावर सकाळी ७ च्या दरम्यान मतदार मतदानासाठी दाखल झाले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी रांगा लागल्या. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रावर विविध सोयी पुरविण्यात आल्या होत्या. दिव्यांग मतदारांना चाकाच्या खुर्चीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. रिसोड येथे दोन सखी मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आली होती.  तेथील सर्व जवाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांभाळली. आज लग्न तिथी होती. काही मतदान केंद्रावर वधु-वरांनी मतदान केले.

रिसोड विधानसभा क्षेत्रात १ लक्ष ६० हजार १३५ पुरुष, १ लक्ष ४३ हजार ९८६ महिला व ६ इतर असे एकूण ३ लक्ष ४ हजार १२७ मतदार आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत यापैकी ८९ हजार ५३५ पुरुष मतदार, ७७ हजार ५०५ महिला मतदार असे एकूण १ लक्ष ६७ हजार ४० मतदारांनी आपला हक्क बजाविला. मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासांत ८.९६ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत २१.८४ टक्के, दुपारी १ वाजेपर्यंत ३५.७६ टक्के व दुपारी ३ वाजेपर्यंत ४६.१६ टक्के मतदारांनी मतदान केले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला.