मोदींसह जागतिक नेत्यांची गोपनीय माहिती उघड

0
15

नवी दिल्ली – जी- 20 परिषदेसाठी ऑस्ट्रेलियाला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर जागतिक नेत्यांची वैयक्तिक माहिती चुकून दुसऱ्या व्यक्तीलाच ई-मेलद्वारे गेल्याचे एका अहवालात उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियानेही असे घडल्याचे मान्य केले असले, तरी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे.

पंतप्रधान मोदींसह परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सर्व जागतिक नेत्यांची माहिती चुकून आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित करणाऱ्या समितीच्या एका सदस्याला ई-मेलद्वारे गेली होती. ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन विभागाकडून ही माहिती गेल्यानंतर त्यांनी तत्काळ वरिष्ठांना कळवून ती काढून टाकली; तसेच संबंधित समितीच्या सदस्यानेही मिळालेली ती माहिती “डिलीट‘ केली, असे ऑस्ट्रेलियातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मोदींची माहिती बाहेर गेल्याबद्दल पंतप्रधान कार्यालयाने जरी प्रतिक्रिया देण्याचे टाळले असले, तरी याबाबत प्रसिद्ध झालेला अहवाल पाहिला असल्याचे आणि आपल्या बाजूने योग्य तो तपास करून खबरदारी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या ई-मेलमध्ये मोदी यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्यासह 31 जागतिक नेत्यांचे पासपोर्ट क्रमांक, व्हिसा आणि इतर माहिती होती.