केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार ?

0
14

वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा एप्रिल महिन्यात केव्हाही विस्तार करण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे. केंद्रात सरकार बनल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा हा दुस-यांदा विस्तार असेल. आगामी विधानसभा निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून काही विभागांना खूश करण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळ विस्तारातून केला जाण्याची शक्यता आहे.
मोदी हे आपल्या मंत्रिमंडळातून सर्वात बुजुर्ग मंत्री नजमा हेपतुल्ला यांना मंत्रिमंडळातून बाहेर करण्याची शक्यता आहे. मात्र हेपतुल्ला यांना एखाद्या राज्याचे राज्यपाल बनविण्याची चर्चा आहे. शिवाय चांगले कामकाज करण्यात अपयशी ठरलेल्या मंत्र्यांना देखील मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आणि नव्या चेह-यांना या विस्तारात संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
नजमा हेपतुल्ला अल्पसंख्यांक प्रकरणांच्या मंत्री आहे. त्यांच्या जागी या मंत्रालयाची जबाबदारी राज्यमंत्री म्हणून काम करीत असलेले मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे. जर असा बदल झाला तर त्यांची ही पदोन्नती ठरेल. मोदी आपल्या मंत्रिमंडळात शिवेसेचे प्रतिनिधीत्व वाढवतील असेही संकेत आहेत. तसेच
राजस्थानलाही मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व दिले जाऊ शकते. तैथील मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची मागणी राहिली आहे की, पक्षाच्या झोळीत मुबलक जागा मिळवून दिल्यानंतरही राज्याला केंद्रीय सरकारमध्ये योग्य प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नाही.
या शिवाय यावर्षी होणा-या बिहार विधानसभा निवडणुक आणि पुढील वर्षी होणा-या काही इतर राज्यांच्या राजकीय समीकरण लक्षात घेऊन मंत्रिमंडळात फेरबदल केले जाणार आहेत. भाजपाची ३ आणि ४ एप्रिलला बंगळूरमध्ये होणा-या दोन दिवसीय कार्यकारिणीच्या बैठकीत या मुद्दयांवर विचार विमर्श केला जाईल आणि एक आराखडा तयार केला जाईल. मंत्रिमंडळाचा विस्तार संसदेच्या अर्थसंकल्पाच्या दुस-या टप्प्यात २० एप्रिलला सुरू होण्याआधीच केला जाण्याची शक्यता सूत्राने वर्तविली आहे.