स्त्री स्कॉडमधून महिला व मुलींमध्ये विश्वास निर्माण करणार- विनीता साहू

0
16

गोंदिया.  दि. ०१ :: महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने दामिनी पथक गठीत केले आहे. परंतू अलिकडे कुटूंबात सुध्दा महिला व मुलींवर अत्याचार होत आहे. अशा अत्याचारग्रस्त महिला व मुलींची दखल घेवून त्यांना न्याय देवून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यात येईल. असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी केले.
आज १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महिला, मुली, बालके व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी सुरु करण्यात आलेल्या स्त्री स्कॉड या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ श्रीमती साहू यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती साहू म्हणाल्या, स्त्री स्कॉडच्या माध्यमातून प्रत्येक घरी भेट देवून महिला, मुली, बालके व ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय अत्याचार होत आहे का याची माहिती घेण्यात येणार आहे. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या स्कॉडच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्याचारग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. ज्यांच्याघरी स्त्री स्कॉड भेट देणार आहे त्यांच्या घराच्या भिंतीवर स्कॉडच्या बोधचिन्हाचे स्टीकर्स लावण्यात येईल. अत्याचारग्रस्तांचे समुपदेशन करण्याचे काम देखील हे स्कॉड करणार आहे. शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी युवती व महिलांची छेडछाड व होणारा त्रास रोखण्यासाठी तसेच बालके, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी स्त्री स्कॉड या सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या पथकाच्या माध्यमातून शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी गस्त करुन छेडछाडीचे प्रकार निदर्शनास आल्यास टवाळखोरांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगून श्रीमती साहू म्हणाल्या, छेडछाड करणाऱ्या गुन्हेगारांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही. युवतींनी स्वरक्षणासाठी स्वयंपूर्ण व्हावे यासाठी हे पथक शाळा व महाविद्यालयात मार्गदर्शन करणार आहे. प्रत्येक दिवशी नविन परिसरात जावून हे पथक महिला, मुली, बालके, ज्येठ नागरिक यांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यात येणार आहे. स्त्री स्कॉड पथक महिलांबद्दलची कायदे, त्यांचा होणार छळ, व्हॉटस्अप, फेसबुक यासारख्या सोशल मिडियावरही महिलांची होणारी फसवणूक याबाबत जनजागृती करणार असल्याने समाजामध्ये एकप्रकारे सुरक्षेची भावना निर्माण करण्यास हे पथक काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
स्त्री स्कॉडचे बोधचिन्ह तयार करणारे अरुण नशिने यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवून श्रीमती साहू यांनी सत्कार केला. स्त्री स्कॉड वाहनाचा आणि ई-चलानचा शुभारंभ देखील त्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार मंजुश्री देशपांडे यांनी मानले.