मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत दाखल, शहीदांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

0
22

मुंबई/गडचिरोली,दि.02- नक्षली हल्ला, दुष्काळी उपाययोजनांसाठी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलविली होती. यावेळी काल नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 15 जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्पण करण्यात आली. तसेच, राज्यातील दुष्काळी स्थितीचा, राज्य सरकारतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या मदतीचा सविस्तर आढावा घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.प्रत्येक पालकमंत्र्यांना दुष्काळग्रस्त भागात भेटी देऊन प्रत्यक्ष आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यानंतर गडचिरोलीकरीता रवाना झाले.राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबूरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी-60 दलाचे 15 जवान शहीद झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत दाखल होऊन शहीदांना मानवंदना दिली. यावेळी त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर वीर शहीद जवानांना भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली व मानवंदना देण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहराज्यमंत्री दिपकजी केसरकर, आदिवासी विकास राज्यमंत्री व पालकमंत्री राजे अमरीशराव आत्राम,खासदार अशोक नेते, जिप अध्यक्षा योगिताताई भांडेकर, गडचिरोलीचे आमदार डॉ देवराव होळी, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे,साकोलीचे आमदार राजेश काशिवार, पोलीस महासंचालक सुबोध जायस्वार,पोलीस अधिक्षक शैलेष बलकवडे,जिल्हाधिकारी शेखर सिंह वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्व वरिष्ठ अधिकारी व चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, ज्येष्ठ नेते नगरसेवक प्रमोद पिपरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.