रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम आज दुसर्या दिवशीही राबविणार

0
26

गोंदिया,दि.11ः-शहरातील अनेक भागांतील अंतर्गत रस्त्यांवर किरकोळ आणि मोठय़ा व्यावसायिकांनी रस्त्यावर दुकाने थाटली. त्यामुळे अर्धे रस्ते दुकानांनी व्यापून गेले आहेत. परिणामी नागरिक आणि वाहनांना ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागते. नगर पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडे केले होते. त्यापत्राच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक वनिता साहू यांनी रामनगर,गोंदियाशहर व वाहतुक शाखेला पत्र देवून रेलटोली ते कुडवा नाका, मरारटोली परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या सूचना केल्या होत्या. नगर पालिका, रामनगर पोलीस आणि वाहतूक शाखेच्या वतीने अतिक्रमण काढण्याची संयुक्त मोहिम १0 मे रोजी हाती घेण्यात आली,ती मोहीम आज दुसर्यादिवशीही मुख्य बाजारपरिसरात राबविण्यात येणार आहे.10 मे रोजी राबविलेल्या मोहिमेत या मोहिमेंतर्गत पथकाने शहरातील २० व्यापाऱ्यांवर १०२ अंतर्गत कारवाई केली आहे. काही व्यापाºयांचे सुमारे ३५ हजार रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आता व्यापाºयांना न्यायालयातून त्यांचे सामान सोडवून घ्यावे लागणार आहे. या मोहिमेनंतर व्यापाºयांचे रस्त्यांवरील सामान दिसेनासे झाल्याने रस्ते मोकळे झाल्याचे चित्र होते.

वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक संजय सिंग यांच्यासह वाहतूक शाखेचे १० कर्मचारी व १० पोलीस कर्मचारी तसेच नगर परिषद बांधकाम विभागातील अभियंता कावडे, अनिल दाते नियोजन विभागातील अभियंता शरणागत, सलाम यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. यांतर्गत चांदनी चौक ते गांधी प्रतिमा, गांधी प्रतिमा ते गोरेलाल चौक, गोरेलाल चौक ते नेहरू चौक तसेच रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत रेल्वे स्टेशन रोड व पाल चौक परिसरात अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्यात आली.
रामनगर परिसरातील रेलटोली परिसरात असलेल्या रेल्वे तिकीटघर ते कस्तूर होटल, शासकीय विर्शाम गृह ते शक्ती चौक, गुरुद्वारा ते पाल चौक आदी भागात ही मोहिम राबविण्यात आली. अतिक्रमण काढण्याकरिता तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. नगर पालिकेच्या वाहनांच्या माध्यमातून अतिक्रमण करुन थाटलेल्या दुकानांतील साहित्य जप्त करुन त्यांना नोटिस देण्यात आल्या. त्या सर्व अतिक्रमणधारकांना न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईत भोजनालय, पान टपरी, चपल जोड्यांची दुकाने आदी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे शहरातील अनेक भागांत अशा प्रकारे दुकाने थाटून रहदारीला अडथळा निर्माण करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी सुरु आहे. पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने कालेखा चौक, मरारटोली बसस्थानक, कुडवा नाका या परिसरात देखील ही कारवाई सुरु राहणार आहे.