शेतकऱ्यांच्या समृध्दीचे नियोजन करा- पालकमंत्री बडोले

0
13

खरीप हंगामपूर्व आढावा सभा

गोंदिया : शासनाच्या कृषिविषयक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. पीक कर्जाची मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज पुरवठा झाला पाहिजे. बोगस बियाणे, खते व किटकनाशकांचा शेतकऱ्यांना पुरवठा होणार नाही याची दक्षता घेवून जिल्ह्यातील शेतकरी समृध्द कसा होईल यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांना दिले.

  आज 31 मे रोजी पवार बोर्डींग गोंदिया येथे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत श्री.बडोले बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, आमदार विजय रहांगडाले, प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जि.प.कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  श्री.बडोले म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंपांना वीज जोडणीसाठी अर्ज केले आहे त्यांना तातडीने वीज पुरवठा करावा. त्यामुळे त्यांना सिंचन करण्यास मदत होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी सौर कृषिपंपाच्या माध्यमातून सिंचन करतील यासाठी सौर कृषिपंप घेण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. बोगस बियाणै, खते व किटकनाशके यांना आळा घालण्यासाठी कृषि निविष्ठा केंद्रांची नियमीत काटेकोरपणे तपासणी करावी. नेहमीच्या शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावरील बियाणे मोफत देण्यापेक्षा अन्य शेतकऱ्यांना मोफत बियाणांचा पुरवठा करुन त्याला त्याचा उपयोग होईल यासाठी मदत करावी असे सांगितले.

 फलोत्पादन अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी फळबागांकडे कसे वळतील याकडे लक्ष दयावे असे सांगून श्री.बडोले म्हणाले, खरीप हंगामात उडीत पिकाचा पेरा वाढला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नगदी पिकाकडे वळविण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात असलेल्या हवामान केंद्राच्या माध्यमातून केंद्र परिसरातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज दिला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. जे शेतकरी या योजनेत अपात्र ठरले त्यांच्या अपात्रतेमधील त्रुटी दूर करुन ते पात्र ठरवून त्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने सहकार विभागाने पुढाकार घ्यावा असे सांगितले.

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज उपलब्ध करुन दयावे असे सांगून श्री.बडोले म्हणाले, यावेळी केवळ 40 टक्केच शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित 60 टक्के शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज पुरवठा करुन त्यांना मदतीचा हात दयावा. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे यासाठी जलसंधारण व जलसंपदा विभागाने नियोजन करावे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची तातडीने उचल करावी. ते उघड्यावर राहून त्याची नासाडी होणार नाही याची दक्षता पणन विभागाने घ्यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.                                              

 आमदार श्री.रहांगडाले म्हणाले, प्रात्यक्षिकासाठी काही शेतकऱ्यांना कृषि विभागाने धान मोफत उपलब्ध करुन दयावा. त्यामुळे त्यांना बियाण्यांचा चांगला उपयोग होईल. खरीप हंगामात शेतकऱ्यांना उडीद बियाणे उपलब्ध झाली पाहिजे. बोगस बियाणे, खते व किटकनाशकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याकडे कृषि विभागाने लक्ष दयावे असे त्यांनी सांगितले.

 प्रास्ताविकातून प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नंदकिशोर नायनवाड यांनी सांगितले की, सन 2018-19 मध्ये प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रात 14 हजार 163 हेक्टरने वाढ झाली आहे. सन 2017-18 या वर्षात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून अर्जुनी/मोरगाव तालुक्यात 1 कोटी 67 लक्ष व देवरी तालुक्यात 2 लक्ष 18 हजार तर माहे फेब्रुवारी 2018 मध्ये आठ तालुक्यात झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 2 कोटी 91 लाख 68 हजार रुपये वाटप केले. 43 हजार 21 मे.टन रासायनिक खताचा वापर सन 2018-19 च्या खरीप हंगामात करण्यात आला. सन 2019 च्या खरीप हंगामासाठी महाबीज आणि खाजगी कंपन्यांकडून 62 हजार 836 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 सन 2018-19 या वर्षात जिल्ह्यातील 1587 निविष्ठा परवानाधारक केंद्राची खरीप व रब्बी हंगामात तपासणी करण्यात आली. त्यापैकी 60 केंद्रांना अनियमीततेबाबत कारणे दाखवा नोटीस तर 29 केंद्रांना विक्री बंदीचे आदेश व 2 केंद्राचे परवाने निलंबीत करण्यात आले. सन 2019-20 या वर्षाकरीता जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांना 230 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असल्याचे श्री.नायनवाड यांनी सांगितले.

  सन 2018-19 या वर्षात मार्च 2019 अखेर जिल्ह्यातील 595 कृषि पंपांना वीज जोडणी देण्यात आली असून सन 2019-20 या वर्षात 2792 कृषिपंपांना वीज जोडणीचे उद्दिष्ट दिल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री.बारापात्रे यांनी दिली.

  जिल्ह्यात असलेल्या विविध सिंचन प्रकल्प व अन्य साधनाच्या माध्यमातून 1 लाख 6 हेक्टरवर सिंचन करण्यात आले. तर 2019-20 या वर्षात 1 लाख 21 हजार 196 हेक्टरवर सिंचनाचे नियोजन असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.छप्परघरे यांनी दिली.

   जिल्ह्यातील मार्केटींग फेडरेशनचे 57 आणि आदिवासी विकास महामंडळाचे 43 अशा एकूण 100 केंद्रावर सन 2018-19 च्या खरीप हंगामात 85 हजार 683 शेतकऱ्यांनी 27 लाख 49 हजार 879 क्विंटल धानाची खरेदी केली असून या धानाची किंमत 474 कोटी 57 लक्ष रुपये असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर धान खरेदीचे पैसे जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी श्री.खर्चे यांनी दिली.

  यावेळी तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने, श्री.पात्रीकर, श्री.तुमडाम, श्री.तोडसाम यांचेसह अन्य तालुका कृषि अधिकारी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्र हिवराचे कार्यक्रम समन्वयक डॉ.देशमुख, कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाहीच्या कार्यक्रम समन्वयक डॉ.उषा डोंगरवार, जलसंपदा विभाग, पणन विभाग, पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम यांनी मानले.