म. गांधी. तंटामुक्त गाव मोहीमेंतर्गत पुरस्कारासाठी पत्रकारांकडून अर्ज आमंत्रित

0
25

१५ जूनपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

वाशिम, दि. ०१ : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत प्रभावी व वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देणाऱ्या बातमीदारांना जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येतो. यासाठी बातमीदारांनी आपल्या प्रवेशिकेची एक मूळ प्रत व दोन सत्यप्रती अशा एकूण तीन प्रतीतील प्रवेशिका विहीत नमुन्यातील अर्जासह १५ जून २०१९ पूर्वी जिल्हा माहिती कार्यालयाकडे पाठवावी.

      महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम प्रभावी व यशस्वीरित्या राबविण्यामध्ये पूरक व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला वस्तुनिष्ठ प्रसिध्दी देणाऱ्या बातमीदारांना हा पुरस्कार देण्यात येतो. प्रथम क्रमांकासाठी पंचवीस हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी २ मे २०१८ ते १ मे २०१९ या कालावधीत मराठी, हिंदी अथवा इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेत प्रसिध्द झालेले लेख, वृत्तांकन, अग्रलेख, फोटो फिचर्स अशा लेखन साहित्याचा विचार होईल. यासाठी वृत्तपत्रांचे बातमीदार, स्तंभलेखक, मुक्त पत्रकार प्रवेशिका पाठवू शकतात.

      एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीच्या एकाच बातमीदाराचा अर्ज संपादकांमार्फत स्विकारण्यात येईल. बातमीदारांचे साहित्य अनके वृत्तपत्रांमधून प्रसिध्द झालेले असेल तर त्या संबंधीचा एकत्रित अर्ज त्या संपादकांपैकी कोणतेही एक संपादक समितीकडे हा अर्ज पाठवतील. प्राप्त प्रवेशिकांचे गुणांकन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत केले जाणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी हे या समितीचे सचिव आहेत. पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याबाबत अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, कक्ष क्र. २०२,दुसरा माळा, प्रशासकीय इमारत, काटा रोड, वाशिम येथे संपर्क साधावा. या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त बातमीदारांनी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.