मुख्य बातम्या:

लघु उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार : नितीन गडकरी गडकरी यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली दि. 4 : देशात आयात होणा-या वस्तू ग्रामीण भागातील लघु उद्योगांच्या माध्यमातून तयार करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर सुक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा भर राहील असा विश्वास आज नितीन गडकरी यांनी या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला.
उद्योग भवन येथे श्री गडकरी यांनी राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्या उपस्थितीत सुक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री पदाचा पदभार स्वीकारला यावेळी विभागाचे सचिव डॉ. अरूण कुमार पांडा यांनी पुष्पगुच्छ देवून उभय मंत्र्यांचे स्वागत केले.
पदभार स्वीकारल्यानंतर श्री गडकरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गडकरी म्हणाले, देशात आयात होत असलेल्या वस्तू ग्रामीण भागातील लघु उद्योगांमध्ये तयार होतील व त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल व पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आयात होणा-या वस्तुंची देशात निर्मिती झाल्यास देशाचा पैसा वाचेल,
यासोबतच देशात निर्मित वस्तूंच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यात येईल. यामाध्यमातून देशातील उद्योगांना गती येईल, असेही गडकरी म्हणाले.
 कृषी क्षेत्रातील टाकावू पदार्थांपासून तसेच मध, बांबू आदी उत्पादनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योग गती घेतील असा विश्वास श्री. गडकरी यांनी व्यक्त केला. देशातील लघु उद्योग बंद का पडतात याचे अध्ययन करून यावर उपाय योजना करण्यात येतील. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत महामंडळ, संस्था यांच्या समस्या जाणून घेवून
त्या सोडविणे व या संस्था सक्षम करण्यासही आपले प्राधान्य असेल असे गडकरी  म्हणाले. 
तत्पूर्वी परिवहन भवन येथे आज श्री गडकरी यांनी भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. मंत्रालयाचे सचिव संजीव रंजन यांनी पुष्पगुच्छ देवून श्री. गडकरी यांचे स्वागत केले. श्री गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यावेळी उपस्थित होत्या.

Share