बोदलकसा पर्यटक निवासात एमटीडीसीचे उपहारगृह सुरु

0
13

गोंदिया,दि.७: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) बोदलकसा (जि. गोंदिया) येथे निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात आता महामंडळाद्वारे नव्याने उपहारगृह सुरु करण्यात आले आहे. एमटीडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कांबळे यांच्या हस्ते नुकताच या उपहारगृहाचा शुभारंभ करण्यात आला.
पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीमार्फत राज्यातील विविध भागात पर्यटक निवास (रिसॉर्टस्) चालवले जातात. विदर्भातही अशी अनेक पर्यटक निवासस्थळे असून बोदलकसा येथील पर्यटक निवास तेथील निसर्गसंपदेमुळे विशेष लोकप्रिय आहे. आता या भागात अधिक पर्यटकांना आकर्षित करुन या भागातील पर्यटनाला तसेच रोजगार वाढीला एमटीडीसीमार्फत चालना देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बोदलकसा पर्यटक निवासाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी दिली.
बोदलकसा पर्यटक निवासात आता सुरु करण्यात आलेल्या उपहारगृहात पर्यटकांसाठी स्थानिक खाद्य पदार्थासोबत राज्यातील विविध प्रांतातील खाद्यपदार्थ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पर्यटकांनी या पर्यटक निवासास भेट देऊन येथील निसर्गरम्य परिसराचा त्याचप्रमाणे स्थानिय खाद्यपदार्थांसोबत महाराष्ट्रातील इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी केले आहे.