चिचोली येथील रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी

0
39

अर्जुनी मोरगाव ,दि.12ः-तालुक्यातील चिचोली-खोखरी येथील स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करून हे दुकान जवळच्या दुसर्‍या परवानाधारकाकडे वळते करण्यात यावे, अन्यथा १७ जुनपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.
तहसीलदार व जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, चिचोली-खोखरी येथील रेशन दुकानदार देवाजी मलखांबे हे शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य वाटप करीत नाहीत. लाभार्थ्यांना कमी धान्य देऊन कार्डवर जास्तीची नोंद केली जाते. केरोसीनचा काळाबाजार करून खाजगी लोकांना विकण्यात येते. चावळी वाचन करीत नाही. बोगस कार्डावर धान्य वाटप करुन शासनाची दिशाभूल करीत आहे. विशेष म्हणजे, २00३ मध्ये रेशनची काळाबाजारी करताना दुकानदाराला पकडण्यात आले होते.
याबाबत संबंधित विभागाला वारंवार तक्रारी करुनही दुकानदारावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, की हे दुकान जवळच्या परवानाधारकाकडे वळते करण्यात आले नाही. यामुळे शिधापत्रिकाधारकांसह शासनाचे नुकसान होत आहे. त्यामुळे १६ जूनपयर्ंत चिचोली-खोखरी येथील स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई करुन हे दुकान जवळच्या दुसर्‍या परवानाधारकाकडे वळते करण्यात यावे, अन्यथा १७ जुनपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिले आहे.