डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज मागविले

0
17

गोंदिया दि. १३ : : डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २ लक्ष रुपये मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये मदरसा इमारतीचे नूतनीकरण व डागडूजी, पेयजलाची व्यवस्था करणे, प्रसाधनगृह उभारणे व त्याची डागडूजी करणे, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर, मदरसांच्या निवासस्थानात इन्वर्टरची सुविधा उपलब्ध करणे, मदरसांच्या निवासी इमारतीचे नूतनीकरण व डागडूजी, संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रिंटर्स, प्रयोगशाळा साहित्य, सायन्य कीट, मॅथेमेटिक्स कीट व अध्ययन साहित्याचा यात समावेश राहणार आहे.
या पायाभूत सुविधांपैकी एका प्रयोजनासाठी फक्त एकदाच अनुदान दिले जाईल. तथापि मदरसांचे इमारतीचे आकारमान, क्षेत्रफळ तसेच विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता गतवर्षी निर्माण केलेल्या सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे योग्य समर्थन प्रस्तावात नमूद केल्यास अशा अपवादात्मक परिस्थितीत पुन्हा त्याच सुविधासाठी मागणी केलेले प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीसमोर विचारार्थ ठेवण्यात येतील. निवड समिती प्रस्तावातील समर्थन विचारात घेऊन योग्य निर्णय घेईल. याबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
याशिवाय ग्रंथालय व प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पुस्तक संच देण्यासाठी बुक बँक सुविधा पुरविण्यासाठी तसेच प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक साहित्य, कंपास बॉक्स इत्यादी उपलब्ध करुन देण्यासाठी एका मदरशाला एकदाच ५० हजार रुपये अनुदान उपलब्ध करुन दिले जाईल. तदनंतर प्रतिवर्षी ५ हजार रुपये अनुदान यासाठी दिले जाईल.
या योजनेचा लाभ राज्यातील धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरशांना दिला जाईल. सदर योजनेचा लाभ उपलब्ध अनुदानाच्या अधीन राहून मदरसांना दिला जाईल. यापेक्षा जास्त प्रस्ताव प्राप्त झाल्यास नोंदणी करुन ३ वर्ष पूर्ण झालेले मदरसे आणि अल्पसंख्यांक बहुल तालुक्यातील मदरशांना प्राधान्य याप्रमाणे देण्यात येईल.
तरी संबंधित मदरसा संस्था चालकांनी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया (संकीर्ण शाखा) खोली क्रमांक २०१ येथे ३१ ऑगस्ट २०१९ पूर्वी सादर करावे. यानंतर येणाऱ्या प्रस्तावावर विचार केल्या जाणार नाही. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.