मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

0
14

मुबंई,दि.15ः- महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर रविवारी होणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून ५ ते ६ तर शिवसेनेकडून दोन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपदाचा समावेश असणार आहे. यामध्ये रिपाईला सुध्दा एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नीति आयोगाच्या बैठकीसाठी दिल्ली दौ-यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. काही महिन्यापासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा सुरु होती. अखेर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे.सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी विस्तार होईल, असे मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केले होते. मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसला रामराम केलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रीपद देण्यास भाजपामधील निष्ठावंतांचा विरोध असल्याची चर्चा आहे. मात्र, विखे व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात आहे.

शिवसेनेला दोन मंत्रीपदे शिवसेनेच्या कोट्यातील एक मंत्रीपद रिकामे असून राष्ट्रवादीतून सेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना ते मिळू शकते. दोन मंत्रीपदे मिळावीत असा सेनेचा आग्रह आहे. याच पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे म्हटले आहे.