जबरानजोत शेतकर्‍यांचा धडक मोर्चा

0
15

चंद्रपूर,दि.19ः- अनुसूचित जाती व इतर पांरपरिक वनवासी वनहक्क कायद्यांतर्गत शेतकर्‍यांना वनजमिनीचे पट्टे मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी स्थानिक गांधी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जबरानजोत शेतकर्‍यांचा धडक मोर्चा मंगळवारला काढण्यात आला.
उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त शेतकर्‍यांच्या या मोर्चात जबराजोत शेतकरी मोठय़ा संख्येत सहभागी झाले होते. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २00६ च्या कायद्यांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वर्षे शेती करणार्‍या शेतकर्‍यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, दावे सादर करणार्‍या शेतकर्‍यांचे दावे मान्य करण्यात यावे, कसत असलेल्या वनजमिनीवरचा कब्जा हटविण्यासाठी जे अधिकारी शेतकर्‍यांवर दबाव टाकून खोट्या स्वाक्षरी घेत आहेत, हा प्रकार बंद करण्यात यावा, शेतीचा पुरावा सिद्ध करण्यासाठी तीन पिढय़ांची अट रद्द करण्यात यावी, जमाती कार्य मंत्रालयाच्या १ जानेवारी २00८ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या कलम १३ (१) (झ) अनुसार मागणीदाराखेरीज अन्य वडीलधार्‍या माणसाचे लेखानिविष्ट कथन हा पुरावा ग्राह्य धरुन शेतीचे पट्टे देण्यात यावे आदी मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्यात आल्या.
स्थानिक गांधी चौक येथून शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा निषेध करत जोरदार नारेबाजी करत शहराच्या मुख्य मार्गाने हा मोर्चा निघाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. शेतकर्‍यांना जमिनीचे पट्टे मिळाले नाही, तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी शासन व प्रशासनाला दिला. शिष्टमंडळात विठ्ठल लोनबले, गजानन आयलनावार, सविता वाटगुरे, दर्शना वाळके, सुलोचना कोवे, रुपेश निमसरकार, प्रशांत उराडे यांचा समावेश होता.